The raksha bandhan festival are changing! New Approach: Raksha Sister-Sister's-Self! | राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!
राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भावाने बहिणीचे रक्षण करावे, तिला जपावे या भावनेतून भारतीय संस्कृतीमध्ये राखीपोर्णिमेचा सण साजरा केला जातो. कालानुरुप सणांमागील संकल्पना बदलत आहेत. बदलत्या काळात स्त्री सक्षम झाली, स्वत:चे रक्षण करण्याची ताकद तिच्यात निर्माण झाली. त्यामुळेच आता राखीपोर्णिमा अनोख्या पध्दतीने साजरी केली जात आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जोर धरु लागला आहे. अनेक शाळांमध्येही मुलांमध्ये हा नवा दृष्टीकोन विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
राखीचा धागा हा भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधाचे प्रतीक मानला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधने होती. राखीपोर्णिमेच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जायचा. त्याच्याशी मनमोकळया गप्पा मारत तिला माहेरची ख्यालीखुशाली कळायची. हळूहळू समाजाची मानसिकता बदलली, स्त्री घराबाहेर पडू लागली. आकांक्षेच्या पंखांवर स्वार होत तिने गरुडझेप घेतली आणि कर्तृत्व सिध्द केले. सणांच्या पारंपरिक महत्वाची चिकित्सा होऊ लागली. सण-समारंभांना आधुनिक आयाम मिळू लागले. यातूनच नवा दृष्टीकोन विकसित होत गेला.
अनेक कुटुंबांमध्ये मुलींचे मुलाप्रमाणे संगोपन करत समानतेचा धडा गिरवला जातो. कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्याचप्रमाणे राखीपोर्णिमेलाही केवळ बहिणीने भावाला राखी बांधावी, हा पूर्वापार चालत आलेला समज मोडीत निघाला आहे. आम्ही चार बहिणी; भाऊ नाही याचे कधीही दु:ख वाटले नाही. आम्ही बहिणी लहानपणापासून एकमेकींना राखी बांधत राखीपोर्णिमेचा सण साजरा करतो, अशी भावना अमृता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
-------------
कोणत्याही बदलाची सुरुवात ही घरापासून होत असते. बदलत्या आयामांचे संस्कार शाळेतूनही होत असतात. माझा मुलगा पहिलीत आहे. परवाच त्यांच्या शाळेत राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक पार पाडले. तेव्हाच राखीपोर्णिमेला भाऊ-भाऊ एकमेकांना किंवा बहिणी एकमेकींना राखी बांधू शकतात, असे शिक्षकांनी सांगितल्याचे त्याने घरी येऊन सांगितले. शाळेने दिलेली ही नवी शिकवण मुलांच्या घडवण्याच्या दृष्टीने मला अत्यंत कौतुकास्पद वाटते.
- सानिका जोशी, पालक
--------------
राखीपोर्णिमेचा असाही आयाम!
अनेक घरांमध्ये मुलगी वडिलांना, भाऊ बहिणीला आणि आईला राखी बांधण्याची पध्दत प्रचलित आहे. कोणतेही नाते दृढ होणे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे राखीपोर्णिमेच्या निमित्ताने हे बंध घट्ट करण्यावर भर दिला जात आहे.
---------
स्वत:लाच राखी बांधते!
राखी म्हणजे सुरक्षिततेचा बंध असे म्हटले जाते. मी लहानपणापासून भावाला राखी बांधते. मोठी झाल्यावर मी शिक्षण, नोकरीनिमित्त एकटी घराबाहेर पडू लागले. बाहेर वावरत असताना स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरच असते. मग राखीचा मान मीच मला का देऊ नये? हा विचार मनात आला. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून मी स्वत:लाच राखी बांधते.
- पूजा मनीष 


Web Title: The raksha bandhan festival are changing! New Approach: Raksha Sister-Sister's-Self!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.