जिथे ६ वर्षांपूर्वी आंदोलन केलं, तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:55 IST2020-06-17T04:13:59+5:302020-06-17T06:55:17+5:30
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची संधी

जिथे ६ वर्षांपूर्वी आंदोलन केलं, तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर
बारामती/कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोट्यातून शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार व शेट्टी यांची मंगळवारी बैठक झाली.
शेट्टी यांनी सहा वर्षांपूर्वी याच निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. त्याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मैत्रीपर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. पवार यांनी दिलेली ऑफर स्वीकारली आहे, असे शेट्टी यांनी पाच तासांच्या बैठकीनंतर सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससोबत जवळीक साधली होती. दीड तपानंतर शेट्टी पुन्हा आमदार होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, ‘स्वाभिमानी’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण आदी यावेळी उपस्थित होते.