राजगुरुनगरचे सुसज्ज लघुसर्वपशू चिकित्सालय धूळ खात
By Admin | Updated: January 16, 2016 02:37 IST2016-01-16T02:37:38+5:302016-01-16T02:37:38+5:30
चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्वरित उपचार मिळावे, या हेतूने राजगुरुनगर येथे बांधण्यात आलेल्या तालुका लघुसर्वपशू चिकित्सालयाची नवीन इमारत बांधकाम

राजगुरुनगरचे सुसज्ज लघुसर्वपशू चिकित्सालय धूळ खात
राजगुरुनगर : चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्वरित उपचार मिळावे, या हेतूने राजगुरुनगर येथे बांधण्यात आलेल्या तालुका लघुसर्वपशू चिकित्सालयाची नवीन इमारत बांधकाम होऊन दोन वर्षे पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यात समन्वय नसल्याने मोठा खर्च होऊनही तिचा वापर होत नाही. एवढी सुसज्ज इमारत होऊनही जुनाट इमारतीत कामकाज सुरू आहे.
इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे, तर कामात अपूर्तता असल्यामुळे पशुसंवर्धन विभाग इमारत ताब्यात घेत नाही. दोन्ही विभागांच्या या टोलवाटोलवीत सरकारचे सुमारे दीड कोटी रुपये खर्च होऊनही सामान्य शेतकऱ्याला आणि पशुपालकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ या चार तालुक्यांसाठीचे लघुसर्वपशू चिकित्सालय राजगुरुनगर येथे आहे. पूर्वी येथे मध्यवर्ती जागेत असलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत २००५ मध्ये विभागीय रेतन केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर येथे शासनाने चार तालुक्यांसाठी लघुसर्वपशू चिकित्सालय मंजूर केले. त्यामुळे चारही तालुक्यांतील जनावरांच्या आरोग्याच्या आणि आजारांच्या बाबतीत उपचारासाठी चांगली सोय निर्माण झाली. नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव २०१० मध्ये मंजूर झाला. त्या वेळी २.२५ कोटी अंदाजपत्रकीय रक्कम होती. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले.
येथे सुसज्ज रुग्णालयाप्रमाणे जनावरांसाठी जनरल वॉर्ड, शस्त्रक्रिया केंद्र, ओपीडी, एक्सरे विभाग, विश्रांती गृह आदी अनेक सुविधांसाठी खोल्या बांधण्यात आल्या. संरक्षक भिंत, शेड उभारण्यात आली. डॉक्टरांसाठी कार्यालय, सभागृह इत्यादी उभारण्यात आले. एकूण दीड कोटी रुपयांचा खर्च झाला; पण अंदाजपत्रकात असलेली अनेक कामे ठेकेदाराने केली नाहीत. त्यामुळे ७५ लाखांचा निधी परत गेला. मंजूर कामातील अनेक कामे केली गेली नाहीत. मुख्यत: फर्निचर केले गेले नाही, जनावरांच्या येण्या-जाण्यासाठी मार्ग केले नाहीत. संरक्षक भिंत अपुरी आहे. काही अनेक कामे अपुरी ठेवण्यात आल्यामुळे पशुसंवर्धन विभाग ही इमारत ताब्यात घेत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन मोकळे झाले. दोन्ही विभागांच्या टोलवा-टोलवीमुळे मोठा खर्च होऊनही येथे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले नाही. (वार्ताहर)
याचा तोटा सामान्य शेतकरी आणि पशुपालकांना होत आहे. सध्या ज्या इमारतीत या विभागाचे काम चालते, ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाची जुनाट इमारत आहे. तेथे काहीही सोयी-सुविधा नसल्याने शेतकरी व पशुपालक तिकडे फारसे फिरकत नाहीत. तेथेही सहायक आयुक्तांसह अनेक पदे रिक्त आहेत. खासगी जनावरांचे डॉक्टर आणि शासनाचे ठिकठिकाणी असलेले जनावरांचे दवाखाने यावरच काम भागविले जात आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ या चार तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दूधउत्पादक आहेत. तसेच, शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. बैलांची संख्या भरपूर आहे. तरीही चार तालुक्यांतील जनावरांसाठी वरदान ठरू शकणारा हा विभाग आणि सुसज्ज रुग्णालय सरकारी अनागोंदी आणि अनास्थेमुळे निरुपयोगी ठरले आहे.
सार्वजनिक विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलाला या कामाचा ठेका दिला गेला. त्या ठेकेदाराने मंजूर असूनही सर्व निधी वापरला नाही. कामही अर्धवट केले. तरी सार्वजनिक विभाग काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन मोकळे झाले. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग ही इमारत ताब्यात घ्यावयास तयार नाही, अशी कुजबूज आहे.