राजगुरुनगरचे दूरध्वनी केंद्र बंद

By Admin | Updated: July 18, 2014 03:51 IST2014-07-18T03:51:56+5:302014-07-18T03:51:56+5:30

वेताळे येथील दूरध्वनी केंद्र महिनाभरापासून बंद असून, तक्रारी करूनही दूरध्वनी खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Rajgurunagar's telephone center is closed | राजगुरुनगरचे दूरध्वनी केंद्र बंद

राजगुरुनगरचे दूरध्वनी केंद्र बंद

राजगुरुनगर : वेताळे येथील दूरध्वनी केंद्र महिनाभरापासून बंद असून, तक्रारी करूनही दूरध्वनी खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून आंदोलनाचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
या केंद्राला वेताळे, सायगाव, साबुर्डी ही तीन गावे जोडलेली आहेत. येथील शेकडो ग्राहक अजूनही 'लँडलाइन' दूरध्वनी वापरत आहेत. या भागामध्ये मोबाईल फोनची 'रेंज' मिळत नसल्याने नागरिकांना दूरध्वनी सेवेवरच अवलंबून राहावे लागते. हे केंद्र २००० सालापासून आजतागायत व्यवस्थित चालू होते. परंतु, कडूस आणि वेताळे गावांदरम्यान केबल तुटल्यामुळे गेले महिनाभरापासून ते बंद पडले आहे. त्याविषयी नागरिकांनी अनेकदा खात्याकडे तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. विभागीय अभियंता गोविंद पोखरकर यांच्याकडेही तक्रार केली. तरीही ते दाखल घेत नसून, आता तर ते तक्रारीसाठी केलेले ग्राहकांचे फोनही उचलत नाहीत. त्यामुळे लोक वैतागले असून, आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील बीएसएनएल सेवा नेहमी बंद असते. पावसाळ्याच्या दिवसांत लोकांना बाहेर पडता येत नसल्याने दूरध्वनीची जास्त गरज असते; पण नेमक्या याच दिवसात ही सेवा वारंवार खंडित होते.
या भागात तुलनेने ग्राहक कमी असल्याने खासगी कंपन्या आपले संपर्कक्षेत्र वाढवीत नाहीत. त्यामुळे लोक दूरध्वनी खात्यावर अवलंबून असतात. पण हे खाते अजिबात त्यांची दखल घेत नाही.
अधिकारी राजगुरुनगरच्या कार्यालयात अनेकदा उपस्थितच नसतात. लोक तिथे तक्रारीसाठी गेले की साहेब पुण्याला मिटिंगला गेले आहेत, अशी उत्तरे मिळतात.
त्यामुळे पुण्याच्या बैठकांच्या तारखा येथील फलकावर लिहून ठेवाव्यात, अशीही लोकांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Rajgurunagar's telephone center is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.