राजगुरुनगर; राजगुरुनगरमधील चांडोली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांवरून महावितरण कार्यकारी उपअभियंता यांचे कार्यालय फोडले. नागरिकांच्या बिलाबद्दल समस्या दूर होत नसल्यामुळे मनसेने काही दिवसापूर्वी याबाबत निवेदन दिले होते. मात्र यावर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे बुधवारी (दि १० ) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत चांडोली येथे महावितरण उपअभियंता मनिष कडू यांचे कार्यालय फोडले.
खेड तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन कालावधीतील वीज बिले अव्वाच्या सव्वा नागरिकांनी आली असुन त्याची योग्य दखल न घेतल्यास अन्यथा वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खेड तालुका मनसेच्या वतीने काही दिवसापुर्वी देण्यात होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व बाजारपेठा बंद असल्याने गेली ५ महिने सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत. तसेच शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच लॉकडाऊनच्या काळात वाढीव विजबिले देऊन विजमंडळाने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. लॉकडाऊन दरम्यान आलेली विजबिले कमी करावीत,विजबिले दुरुस्ती करून मिळावीत,रीडिंग प्रमाणे महिन्यानुसार बिले मिळावीत , अशी मागणी करून या मागणीची ४ दिवसात दखल घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.