पुणे : आम्ही बंडू फाटकांच्या फार्म हाऊस राजेंद्र हगवणे आहे असं पोलिसांना कळवलं होतं, त्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा त्यांनी तिथे ते नाही असं आम्हाला सांगितलं. तपासात ते फाटक यांच्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती समोर येत आहे. आमची माहिती देखील शंभर टक्के खरी होती. पोलिसच नाही म्हणाले अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी दिली आहे.
फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी सातव्या दिवशी अटक केली. या दोघांना शुक्रवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. ७ दिवस हे कुठे कुठे फिरले याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पवना डॅम परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसचा उल्लेख करण्यात आला आहे. ही माहिती आम्ही अगोदरच पोलिसांना दिली असल्याचे मोहन कस्पटे यांनी सांगितले आहे. आम्ही राजेंद्र हगवणे यांचं लोकेशन सांगितलं होतं. साहेबांनी चौकशी केली. त्यांनी तिथे नाहीये असं आम्हाला कळवलं. आता तपासांती समजत आहे की, ते तिथेच होते. आमची माहिती शंभर टक्के असल्याची पुष्टी आम्हाला मिळत आहे. या निलेश चव्हाणचा देखील लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
निलेश चव्हाणला लवकर अटक करा
ज्याप्रमाणे राजेंद्र हगवणे मुलगा सुशील पळाले, त्यावेळी अजित पवार यांनी तातडीने पकडायला सांगितलं होतं त्यानंतर ते सापडले. त्याप्रमाणे पोलिसांनी तत्परता दाखवून चव्हाणला अटक केली पाहिजे. पोलिसांना जेव्हा कल्पना दिली होती, तेव्हाच जर पोलिसांनी त्याला अटक केली असती, तर तो आज पळाला नसता. तो निलेश चव्हाण कुठे गेला आहे त्याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांना केली आहे.
काही राजकीय हस्तक्षेप आहे का? अनिल कस्पटे यांचा सवाल
जर हे आरोपी फरार असतानाही मोकळेपणाने हॉटेलमध्ये राहत होते, गाड्यांतून फिरत होते, तर तपास प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे का?असे म्हणत अनिल कस्पटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पोलीस त्यांना व्हीआयपी वागणूक देत आहेत. यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? हे सरकारने तपासावं अशी मागणी कस्पटे यांनी केली होती.
दरम्यान या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं आहे. ते ७ दिवस कुठे कुठे फिरले याचीही माहिती समोर आली आहे.