प्रजा दारात आल्याने राजा उदार
By Admin | Updated: June 11, 2017 03:53 IST2017-06-11T03:53:59+5:302017-06-11T03:53:59+5:30
लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष

प्रजा दारात आल्याने राजा उदार
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी थेट आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर ‘हंडा’ मोर्चा नेला. त्यानंतर आयुक्तांनी लगेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोर्चाचा परिणाम होऊन लालटोपीनगरात काही वेळातच पाण्याचा टँकर दाखल झाला.
पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २ मेपासून महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण अवलंबले आहे. शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये तिसऱ्या, चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पिंपरी, मोरवाडी येथील लालटोपीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी लालटोपीनगरमधील महिलांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील अविष्कार बंगल्यावर हंडा मोर्चा नेला.
हंडा, बादल्या, कळशी घेऊन महिला बंगल्यावर पोहोचल्या. त्यांनी आयुक्तांपुढे पाणी समस्येचे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तातडीने उपाययोजना करून लालटोपीनगरवासीयांची पाणी समस्या दूर करा, असे आयुक्तांचे आदेश मिळताच, प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. मोर्चातील महिला आयुक्तांना भेटून पुन्हा घरी पोहोचेपर्यंत त्या भागात चक्क पाण्याचा टँकर दाखल झाला. महिलांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मात्र मॉन्सून अद्याप दाखल न झाल्याने पाणी कपात कायम राहिली आहे. आयुक्तांच्या निवासस्थानी मोर्चा नेताच, तातडीने लालटोपीनगरच्या रहिवाशांसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा टँकर पाठविला. आंदोलन केल्यानंतर प्रश्न सुटतो, महापालिका काहीतरी तोडगा काढते, याचा प्रत्यय लालटोपीनगरच्या रहिवाशांच्या आंदोलनामुळे आला आहे. त्यामुळे आंदोलन केल्यास प्रश्न सुटेल, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान शहर परिसरामध्ये व्हॉल्वमधून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होईल. तसेच अनेक ठिकाणी बांधकामालाही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. या काळात बांधकाम परवाना देण्याचे थांबवले तरी पाण्याची बचत होईल. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडत असतानाही पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सोसायट्यांना भुर्दंड : पाणी विकत घेण्याची वेळ
महापालिका प्रशासनाने शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला २५ टक्के पाणी कपातीचे धोरण ठरले. नंतर मात्र नागरिकांची आरेड होऊ लागताच, निर्णय बदलण्यात आला. पाणी कपात दहा टक्यावर आणली. तसेच पाऊस सुरू होताच, पाणी कपात रद्द करून पूर्ववत पाणीपुरवठा केला जाईल, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली. तसेच अनेक सदनिकांमध्ये वरच्या मजल्यावर पाणी येत नाही. त्यामुळे बहुतांशी सोसायटींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी कपात रद्द करावी अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवले जाते. पण हे टँकर नेमके कुठे भरले जातात? याचे गुढ कायम आहे.