खेडच्या पूर्व भागात धुवाधार पाऊस

By Admin | Updated: June 12, 2017 01:16 IST2017-06-12T01:16:52+5:302017-06-12T01:16:52+5:30

खेडच्या पूर्व तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले

Raining in the east of the village | खेडच्या पूर्व भागात धुवाधार पाऊस

खेडच्या पूर्व भागात धुवाधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले असून, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांनाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्यामुळे शेतांचे बांध फुटून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. मृग नक्षत्राच्या तोंडावर वरुणराजाने केलेली कृपा खरीप पिकांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाड्याचे पावसात रूपांतर होत होते. परंतु अपेक्षित पाऊस सतत हुलकावणी देत होता. अखेर रविवारी (दि. ११) खेडसह शिरूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दक्षिण बाजूकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी बरसण्यास सुरुवात केली अन् काही क्षणांतच सगळीकडे जलमय परिस्थिती तयार झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर आले आहेत. करंदी परिसरातील नप्ते वस्तीलगत असलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे रस्ता वाहून गेला आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकीत सह परिसरातील व्यहाळी, वरकुटे, कचरवाडी या परिसरामध्ये रविवारी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले पाहायला मिळाले.
यंदा उन्हाळ्यामध्ये पारा ४१ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने जनता प्रचंड उकाड्याने त्रस्त झाली होती. शनिवारी दिनांक ३ जुनला पहिला पाऊस झाला होता. त्यानंतर ५ जून सोमवार आणि आज ११ जून रविवारी रोजी देखील झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये देखील सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक
काळेकुट्ट ढग निर्माण होऊन काही काळ अंधार दाटला होता.
विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाने दमदार सुरुवात केली. सुमारे दीड तास पाऊस संथ सुरु होता. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. पावसामुळे निमगांव केतकीतील वाड्यावस्त्यांवरील रात्री उशीरा पर्यंत गायब झाली होती. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

Web Title: Raining in the east of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.