मान्सूनने निकोबार बेटांपर्यंत धडक दिलेली असताना गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पुण्यातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उकाड्यापासून लोकांची सुटका झाली आहे. आज सकाळी देखील पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. अकराच्या सुमारास शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोथरूड, सन सिटी रोड, सिंहगड रस्ता, धायरी फाटा, कोंढवा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. औंध रोड व इतर भागांत मुसळधार पावसाची हजेरी, वीज पुरवठा खंडित झाला आहे. एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळालेला असला तरी पावसामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात असह्य उकाडा जाणवत होता. सोमवारी (दि. १२) दुपारी ढगाळ वातावरण होते. पाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींमुळे पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. १८ मेपर्यंत शहरातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पावसाच्या सरींनी शहरातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. पावसाच्या जोरदार सरींमध्ये भिजण्याचा आनंद पुणेकरांनी लुटला. पावसामुळे रस्त्यांवरची वाहतूक काहीशी मंदावली होती. उपनगरांमधील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...पाऊस झाल्याने अनेक भागात रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रसंगही घडले आहेत. यामुळे दुचाकी चालविताना जरा जपूनच चालवावी लागणार आहे. नाहीतर दुचाकी स्लीप होईन पडल्याने दुखापत होण्याची शक्यता आहे. रस्ते धुपण्यास बराच वेळ आहे, यासाठी सतत पाऊस पडावा लागणार आहे. रस्त्यावरील पडलेले ऑईल, धूळ आणि टायर घासून निर्माण झालेला कार्बन यामुळे रस्ता निसरडा असणार आहे.