हडपसरमध्ये तुटले रेल्वे फाटक ; दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:34 IST2018-07-12T14:20:28+5:302018-07-12T14:34:53+5:30
ससाणेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर भुयारी मार्ग करायचा असा सूर काढल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय स्पर्धेत उड्डाणपुलाचे घोंगडे भिजतच राहिले.

हडपसरमध्ये तुटले रेल्वे फाटक ; दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा
हडपसर : ससाणेनगर व सय्यदनगरला जोडणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगचे फाटक तुटल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील काही दिवसात तिसऱ्यांदा हे फाटक तुटण्याची घटना घडली असून परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेल्वे आली असता रेल्वे मार्गावरील गेट कर्मचारी उघडायला गेले. तेव्हा हे गेट तुटून पडले. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जवळपास दीड तास या गेटची दुरुस्ती सुरु होती.
वाहतूक पोलीस उपस्थित असल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे येथे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुककोंडीच्या घटनेत वाढ झाली आहे. रेल्वे गेट रुंदीकरण करण्यासाठी नूतनीकरण करून ४० लाख खर्च करूनसुद्धा या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
.............
ससाणेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर भुयारी मार्ग करायचा असा सूर काढल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय स्पर्धेत उड्डाणपुलाचे घोंगडे भिजतच राहिले. ससाणेनगरच्या या गेटच्या समस्येवर उपाय म्हणून काळेपडल येतील गेटमधून वाहतूक वळविण्यात आली. मात्र, तरीसुध्दा रस्त्यावर सुमारे २ किलोमीटरच्या पुढे रांग लागल्या.