अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:07 PM2018-06-22T15:07:23+5:302018-06-22T15:07:23+5:30

आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे : डॉ. बाबा आढाव

Racial discrimination explosion than anu bomb: Dr. Baba Adhav | अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

Next
ठळक मुद्देवर्षा गुप्ते यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारचळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे

पुणे : समानता हे समाजवादाचे मुख्य सूत्र आहे. समाजातील वंचितांच्या मार्गातील अडथळे दूर करुन त्यांना प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. आपल्या देशात आजही जातीय विषमतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली ही विषमता दूर करणे हे मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. चळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करून आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 
ज्ञान फाऊंडेशनतर्फे पहिला लोकनेते भाई वैद्य स्मृती कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेत्या वर्षा गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आढाव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिन शिंदे आणि अर्चना मुंद्रा उपस्थित होते.  
आढाव म्हणाले, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे. शोषणाची जाणीव ही शोषणाविरूद्ध लढण्याची पहिली पायरी असते. समाजाची प्रगती ही त्या समाजातील चिंतनशीलता आणि कलात्मक सृजनशीलता यांच्यातून प्रतीत होत असते. भारतीय विचार देशवासीयांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपवत नेणे गरजेचे आहे.  
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, जातीअंताचे स्वप्न, सार्वभौमत्व आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे शिक्के मारून पुरोगाम्यांना डांबण्याचे षडयंत्र देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रशासकीय यंत्रणा भेदून टाकण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून त्यादृष्टीने सुरू असलेली वाटचाल फारच दुर्दैैवी आहे.
गुप्ते म्हणाल्या, आजपर्यंत केवळ काम हाच पुरस्कार मानून मी माझ्या मार्गावर कार्यरत राहिले. भाईंच्या विचारांच्या शिदोरीने एका सर्वसामान्य स्त्रीचे रुपांतर कार्यकर्तीमध्ये झाले. समाजवादी विचारांनी माज्या जीवनाला दिलेली दिशा सार्थकी लागण्यासाठी शेवटपर्यंत मी या मार्गावर कार्यरत राहणार आहे.  
यावेळी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले झोपडपट्टीतील विद्यार्थी अनिकेत पिल्ले,अनिकेत तिंडे, रागिणी गंगावणे, मुस्कान शेख आणि सूरज खांदवे यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञान फाऊंडेशनचे विश्वस्त दिपक ढमाले यांनी आभार मानले. 

Web Title: Racial discrimination explosion than anu bomb: Dr. Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.