कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:20+5:302021-02-05T05:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या येडगाव धरणातून ३१ जानेवारीपासून कुकडी डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिल्या ...

कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या येडगाव धरणातून ३१ जानेवारीपासून कुकडी डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिल्या टप्प्यातील हे आवर्तन सुरु करण्यात आले. प्रत्यक्षात एक फेब्रुवारीपासून या आवर्तनाला प्रारंभ होणार आहे. यापूर्वी पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड आणि मीना शाखा कालव्याद्वारे विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
४० दिवसांच्या आवर्तनात अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील ४.९० टीएमसी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूरसह पारनेरसाठी २.९० टीएमसी असे एकूण ७.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.
दरम्यान, रब्बी हंगामाचे पहिले आवर्तनाचा लाभ पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात २८ तारखेला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तनाकरिता येडगाव, वडज, माणिकडोह, डिंभे डावा आणि उजवा कालव्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. ४० दिवसांच्या या आवर्तनाचा लाभ जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला होणार आहे. या सात तालुक्यांमधील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होऊन हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
चौकट
कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणात १.८९ टीएमसी (९७.४२ टक्के), वडज धरणात ०.९७७ टीएमसी (८३.२८ टक्के), माणिकडोह धरणात ४.३९ टीएमसी (४३.१८ टक्के), पिंपळगाव जोगा १.६३ टीएमसी (४२.०१ टक्के), डिंभा धरणात १०.७९ टीएमसी (८६.४० टक्के) असे एकूण १९.६९ टीएमसी (६६.३६ टक्के) उपयुक्त पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजअखेर २१.३० टीएमसी (७१.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.
वडज धरणातील पाण्याचा साठा मीना व वडज कालवा आणि मीना नदीच्या वापरासाठी ठेवण्यात आले आहे.
कोट
जुन्नर शहर आणि परिसरातील गावांसाठी दीड टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आवर्तनासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत पाणी साठा वापरला जाणार नाही . आवर्तन संपल्यानंतर कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेला शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
अतुल बेनके, आमदार
फोटो - डिंभे डावा कालव्याद्वारे सुरु असलेले विसर्ग.