थंडीने गोठली दुधाची मात्रा
By Admin | Updated: December 20, 2014 00:03 IST2014-12-20T00:03:41+5:302014-12-20T00:03:41+5:30
कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे

थंडीने गोठली दुधाची मात्रा
पिंपरी : कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. दुग्ध उत्पादनात सरासरी १० टक्क्यांनुसार ५० हजार लिटर घट असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
पिंपरी - चिंचवड शहर परिसरात १५ हजारांवर दुभती जणांवरे आहेत. यासह मावळ तालुक्यातील दुभत्या जनावरांची संख्या ४५ हजार ९२१ आहे. त्यामध्ये १२ हजार ८४८ गाई, २३ हजार ११३ म्हशी, १ हजार ३०६ मेंढ्या, ८ हजार ६५४ शेळ्यांचा समावेश आहे.
मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडेही २४ हजार ९३१ दुभती जनावरे आहेत. त्यामध्ये १० हजार १८० गाई, ११ हजार ११३ म्हशी, ५२१ मेंढ्या, २ हजार ९१८ शेळ्यांचा समावेश आहे.
सध्या तापमान ९ अंशांपर्यंत घसरले आहे. ठरावीक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीत दुभत्या जनावरांसाठी बंदिस्त गोठे बांधले आहेत. येथील दूध उत्पादनावर तुलनेने कमी परिणाम होतो. मात्र ४ ते दहा पशुधन असणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांकडील गोठे साध्या पद्धतीचे आहेत. त्यांनी घराशेजारी भिंतीलगतच लाकडांच्या खांबांवर कौलांचे छप्पर करून, तावदान ठोकून कमी खर्चात गोठे तयार केले आहेत. त्यांना जास्त फटका बसत आहे. (वार्ताहर)