अतुल चिंचली-पुणे: आम्ही पुरुषोत्तमची वाट पाहतोय, या स्पर्धेत एक वेगळीच ऊर्जा असते, पुरुषोत्तमसाठीच महाविद्यालयात प्रवेश घेतो, अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी पुरुषोत्तम स्पर्धेसाठी तयार आहेत. मात्र आयोजक महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना पुरुषोत्तमसाठी मुहूर्तच मिळत नाहीये.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्याटप्याने सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्याबरोबरच चित्रपट, नाटक अशा मनोरंजक गोष्टींनाही परवानगी मिळाली आहे. महाविद्यालये सुरू होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. महाविद्यालयाच्या कला मंडळातील कलाकार पुरुषोत्तमसारख्या एकांकिका स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. जानेवारीत महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने महाविद्यालयात असणाऱ्या कला मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी आणि महाराष्ट्रीय कलोपासकच्या आयोजकांशी संवाद साधला.............आम्ही नाटकासाठी महाविद्यालयात जातो. दरवर्षी स्पर्धा ऑगस्टमध्ये असते. त्यामुळे आमच्या मिटिंग मार्च मध्ये होतात. यंदाही मिटिंग झाल्या आहेत. पुरुषोत्तमला दुसरा कुठलाही पर्यायच ठेवता येणार नाही. महाविद्यालयाने सरावाला जागा नाही दिली. तरी आम्ही बाहेर कुठेही सराव करू. आम्ही पुरुषोत्तम होणार याच आशेवर आहोत. प्रणव करे, गरवारे वाणिज्य महाविद्यालय ..........