नीरा :पुरंदर तालुक्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. गावागावांतून या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. चोरी, दरोडा, आग, सर्पदंश, बिबट्याचा हल्ला, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेली ही यंत्रणा प्रभावी ठरत होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे आणि यंत्रणेच्या देखभालीकडे लक्ष न दिल्याने ही सुविधा बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत जलद मदत मिळणे कठीण झाले आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे १८००२७०३६०० या क्रमांकावर कॉल करून गावातील कोणतीही व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीची माहिती देऊ शकत होती. यामुळे संबंधित पोलिस ठाण्याला तत्काळ माहिती मिळून घटनांवर नियंत्रण मिळविणे शक्य होत होते. चोरी, दरोडा, आग, अपघात यांसारख्या घटनांवर त्वरित कारवाई होत असे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी या यंत्रणेचा वापर करणे बंद केले आहे. परिणामी, ही यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून, ग्रामपंचायतींचे पैसेही वाया जात आहेत.
तालुक्यातील वाढत्या गुन्ह्यांमुळे चिंता
गेल्या दोन-तीन महिन्यांत पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी आणि विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. नीरा, मांडकी, जेऊर, पिंपरे, गुळुंचे, कर्नलवाडी, थोपटेवाडी, पिसुर्टी यांसारख्या गावांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात जेऊर, मांडकी, पिंपरे (खुर्द), गुळुंचे, कर्नलवाडी येथे चार-पाच व्यक्ती कोयते आणि रुमाल बांधून घरफोडीच्या उद्देशाने फिरताना ग्रामपंचायतींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आढळले. मात्र, अशा वेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर न झाल्याने या घटना रोखण्यात अपयश आले आहे.
ग्रामपंचायतींची उदासीनता
मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींनी या यंत्रणेची देखभाल आणि त्यासाठी लागणारी रक्कम न भरल्याने ही योजना बंद पडली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आर्थिक भार ग्रामपंचायतींवर असतो. मात्र, ग्रामपंचायती या यंत्रणेचा उपयोग ग्रामसभेची माहिती, पाणीपुरवठा, आरोग्य शिबिरे, रेशन वाटप, आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठीही करत नाहीत. हजारो रुपये खर्च करूनही ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन का आहे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
ग्रामस्थांची मागणी
ग्राम सुरक्षा यंत्रणा पुन्हा कार्यान्वित व्हावी, अशी मागणी तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थ करीत आहेत. ही यंत्रणा सुरू असताना चोरी आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळत होती. सध्या जिल्हा पातळीवर ही योजना पुन्हा प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांनी या यंत्रणेचा वापर वाढवून गावातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे.