पंजाबी-मराठीचे नाते साहित्य संमेलनामुळे दृढ
By Admin | Updated: May 21, 2015 01:49 IST2015-05-21T01:49:08+5:302015-05-21T01:49:08+5:30
मुघलांच्या संरक्षणाबरोबर पंजाब व इतर राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी निभावली. पंजाब वाचविण्यासाठी मराठे पानिपताच्या लढाईत प्राणपणाने लढले.

पंजाबी-मराठीचे नाते साहित्य संमेलनामुळे दृढ
पुणे : मुघलांच्या संरक्षणाबरोबर पंजाब व इतर राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी निभावली. पंजाब वाचविण्यासाठी मराठे पानिपताच्या लढाईत प्राणपणाने लढले. हे पंजाबी आणि मराठी माणसाचे नाते आहे. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे नाते अधिक दृढ झाले, असा आशावाद वसंत व्याख्यानमालेतील परिसंवादात बुधवारी प्रकट झाला.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेत भाऊसाहेब मोडक स्मृती व्याख्यानात ‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने’ या विषयावरील परिसंवादाने मालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचा बुधवारी समारोप झाला. घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष सुरेश पिंगळे उपस्थित होते. सभेचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मोरे यांनी महाराष्ट्र व पंजाबच्या ऐतिहासिक नात्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, स्थानिक भाषांचा वापर वाढल्यानंतर दुसऱ्या प्रांतात जाऊन तेथे संस्कृती, भाषा रुजविणारे संत नामदेव हे पहिले भारतीय होत.
डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘‘गेल्या १३ वर्षांत बृहन्महाराष्ट्रात संमेलन झाले नव्हते. घुमानच्या संमेलन खऱ्या अर्थाने अखिल भारतीय ठरले. मराठी भाषा इतर भाषांशी जोडण्याची वेळ आली आहे.
पायगुडे म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषेचा आणि शब्दांचा उत्सव आहे. उत्सवीकरण झाले तरी हरकत नाही; पण दर्जा सांभाळत हा उत्सव झालाच पाहिजे. दरम्यान व्याख्यानमालेतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बारभाई यांच्यासह चिन्मय अत्रे, अभिषेक घैसास, नेहा देसाई व मंदार कारंजकर या तरुण कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मंदार बेडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
अध्यक्ष होणे
हा क्लायमॅक्स
४घुमान येथील संमेलनाचे अध्यक्ष होणे हा माझ्या आयुष्यातील ‘क्लायमॅक्स’ आहे, असे वर्णन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत संमेलनावर भाषण देणे हीच संमेलनाची फलश्रुती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
४ज्येष्ठांसह तरुण कार्यकर्त्यांचा करण्यात आला सत्कार.