प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरूणीला जम्मू-काश्मीरमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 15:03 IST2018-01-25T18:16:41+5:302018-01-26T15:03:23+5:30
एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.

प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरूणीला जम्मू-काश्मीरमधून अटक
पुणे- जम्मू- काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरुणीला जम्मू- काश्मीरमधून अटक करण्यात आली. दक्षिण काश्मीरमधून तिला अटक करण्यात आली असून तिचा नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, याचा तपास सुरु आहे. एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला. ही तरुणी सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असून तेथेच ती असल्याचे व ती कोठेही गेली नसल्याचे तिच्या आईने सांगितले., अशी माहिती पुणे पोलीस दलाचे सह आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
बंडगार्डन रोडवरील एका शाळेत ती शिकत होती. त्यावेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसशी संपर्कात आली होती. तिच्या वागणुकीत व पोशाखात बदल झाल्याने व ती धार्मिक बाबीत रुची घेऊ लागली. ती बाब तिच्या आई वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी एटीएसशी संपर्क केला होता. तिला सिरीयात मेडिकलला प्रवेश देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एटीएसने मौलवीच्या मदतीने तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आपण आता त्यांच्या संपर्कात राहणार नाही, असे सांगितले होते.
यानंतर ती सुधारली असे समजले जात होते. त्यानंतर अचानक ती काश्मिरात असल्याची बातमी आली. याबाबत सह आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले, की गुप्तचर विभागाकडून काल याची माहिती आली. आम्ही तिच्या घरी जाऊन चौकशी केली. ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. ती सध्या कोठे आहे हे सांगू शकत नाही, असे तिच्या आईने सांगितले. पोलिसांना तिचा ठाव ठिकाणा माहीत नाही, असे कदम यांनी सांगितले.