पहिल्याच पावसाने पुणेकरांची दाणादाण; नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यास अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:47 AM2018-06-08T05:47:16+5:302018-06-08T05:47:16+5:30

शहरात मॉन्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली. बुधवारी सायंकाळी शहरात बहुतेक सर्व भागांत एक-दीड तास धुव्वाधार पाऊस झाला.

 Pune's first rain rains; Obstacles to water flow through drains | पहिल्याच पावसाने पुणेकरांची दाणादाण; नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यास अडथळे

पहिल्याच पावसाने पुणेकरांची दाणादाण; नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यास अडथळे

Next

पुणे : शहरात मॉन्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली. बुधवारी सायंकाळी शहरात बहुतेक सर्व भागांत एक-दीड तास धुव्वाधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांवर पाणी-पाणी झाले, नाल्यांमधून पाणी वाहून न गेल्याने चौकाचौकांत पाण्याची तळी साठली होती. तर काही भागांत घरांमध्येदेखील पाणी शिरले. शहरामध्ये मॉन्सून पावसाची अद्याप सुरुवात होणार असताना पहिल्याच पावसाने महापालिका प्रशासनाच्या कामांचे वाभाडे काढले.
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी संपूर्ण शहरामध्ये पावसाळीपूर्व कामे केली जातात. यामध्ये ओढे- नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जातात. यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्चदेखील केला जातो. परंतु, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की महापालिका प्रशासनाकडून केलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या उत्कृष्ट कामांचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागतात. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साठणे, खड्डे पडणे, ओढे-नाले तुबंणे पुणेकरांसाठी नवीन नाही. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिका आयुक्त सौरभ राव व महापौर मुक्ता टिळक यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीची कामे १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. ही कामे करण्यासाठी ३१ मे ही डेडलाईन असतानाही कामे पूर्ण न झाल्याने ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पावसानेदेखील प्रशासनाला ५ जूनपर्यंत वेळ दिला अन् ६ जून रोजी संपूर्ण शहरामध्ये जोरदार पाऊस बरसला.
परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचे धिंडवडे निघाले. शहरात केवळ एक-दीड तास झालेल्या मुसळधार पावसात शहरामध्ये जागोजोगी पाणी साठले होते. पर्वती परिसर, नीलायम थिएटर, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, कॅम्प परिसर, कर्वे पुतळा चौक, लॉ कॉलेज रस्ता, घोले रोड, सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, जंगलीमहाराज रस्ता, शिवाजीनगर, नळस्टॉप आदी सर्वच भागांतील रस्त्यांवर तळीच्या तळी साठली होती. त्यात पाणी वाहून नेणाºया नाल्याची योग्य सफाई न झाल्याने रस्त्यांवरून वाहनारे पाणी चौकांमध्ये येऊन येथे मोठे तळी निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळाले.

रस्त्यांवरील स्पीडब्रेकर ठरतात अडथळा
शहरातील अनेक रस्त्यांवर जागोजागी स्पीडब्रेकर टाकण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवर पावसाळी गटारे काढताना, स्पीडब्रेकर टाकताना तांत्रिक गोष्टींचा, पावसाच्या पाण्याचा विचार न करतातच टाकले जातात. याचाच परिणाम रस्त्यावर होत असून, बुधवारी झालेल्या पहिल्या पावसात शहरातील अनेक रस्त्यांवरील हे स्पीडब्रेकर पाणी वाहून जाण्यात अडथळा ठरत आहे.

अनेक मोठ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्याची सुविधाच नाही
महापालिका प्रशासनाकडून सिमेंट रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाळी गटाराची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरूनच वाहत असल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते.

सिमेंटमुळे रस्त्यांची पाणीवहन क्षमता कमी
गेल्या काही वर्षांत शहरामध्ये बहुतेक सर्वच भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. पूर्वी डांबरी रस्त्यांच्या कडेला किमान काही भाग मातीचा असल्याने पावसाचे पाणी येथून जमिनीत जिरत असे. परंतु, आता सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे सर्व पाणी वाहून जात असून, या सिमेंट रस्त्यांची पाणीवहन क्षमता कमी असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

फुटपाथच्या कामामुळे लक्ष्मी रस्त्यावर गैरसोय
शहरातील सर्वाधिक गर्दीचा व वर्दळीच्या लक्ष्मी रस्त्यावर फुटपाथ सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी या रस्त्यावरील संपूर्ण फुटपाथ खोदून ठेवले आहेत. कामासाठी जागोजागी वाळू, सिमेंट व ब्लॉकचे ढीग लावले आहेत.
बुधवारी शहरात झालेल्या पावसामुळे लक्ष्मी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. येथे अनेक ज्येष्ठ नागरिकदेखील खरेदीसाठी येत असून, या कामांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  Pune's first rain rains; Obstacles to water flow through drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.