पुणे : पुणेकर नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत लॉकडाऊन काळात मिळकत कर भरण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. या काळात तब्बल २ लाख ३३ हजार पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीने २८० कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे.पालिकेचे २०२०-२१ हे आर्थिक वर्ष सुरू व्हायला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागू व्हायला एकच गाठ पडली. महापालिका हद्दीत १० लाख ५७ हजार ७१६ मिळकती आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करामधून पालिकेला १ हजार ५११.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पालिकेच्या जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९ लाख १३ हजार ८५५ इतकी असून त्यांच्याकडून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच नवीन समाविष्ट ११ गावांमधील १ लाख ४३ हजार ८६१ मिळकतींमधून १४६ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, याकरिता महापालिकेने संकेतस्थळावर मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेलीआहेत.नेट बँकिंगसह विविध डेबिट-क्रेडिट कार्ड, पेमेंट अँपद्वारे कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १ एप्रिल ते २८ मे या काळात २ लाख ३३ हजार पुणेकरांनी २८० कोटींचा भरणा केला आहे. यातील २ लाख ९ हजार ५६४ नागरिकांनी २२३ कोटी ४३ लाखांचा कर जमा केला आहे. तर, ११ हजार २३२ मिळकतधारकांनी ३६ कोटी ७० लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. तर ९ हजार ३११ मिळकतधारकांनी ८ कोटी ३४ लाख रुपयांचा कर रोखीने भरला आहे. पालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रावर ११ मे ते २८ मे या काळात २० हजार १७२ मिळकतधारकांनी ४६ कोटी ६२ लाख रुपयांचा कर जमा केला आहे.
लॉकडाऊन काळात पुणेकरांचा महापालिकेला मदतीचा हात; ऑनलाइन भरला २८० कोटींचा कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:10 IST
कर्तव्यदक्ष पुणेकरांनी घालून दिला आदर्श
लॉकडाऊन काळात पुणेकरांचा महापालिकेला मदतीचा हात; ऑनलाइन भरला २८० कोटींचा कर
ठळक मुद्देतब्बल २ लाख ३३ हजार मिळकतधारकांनी जमा करनेट बँकिंगसह विविध डेबिट-क्रेडिट कार्ड, पेमेंट अँपद्वारे कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पालिकेला १ हजार ५११.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित