पुणेकरांनो काळजी घ्या, कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:10+5:302021-04-25T04:10:10+5:30

पुणे : सध्याची परिस्थिती कठीण असून आपल्याला एकत्र लढा द्यायचा आहे. लवकर निदान व्हावे, म्हणून कोरोनाची चाचणी करणे गरजेचे ...

Punekars be careful, they want to win the match against Corona | पुणेकरांनो काळजी घ्या, कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा आहे

पुणेकरांनो काळजी घ्या, कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा आहे

पुणे : सध्याची परिस्थिती कठीण असून आपल्याला एकत्र लढा द्यायचा आहे. लवकर निदान व्हावे, म्हणून कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे उपचार तत्काळ घेता येतील आणि पुढील धोका टाळता येऊ शकेल. आपल्याला कोरोनाविरोधातील सामना जिंकता येईल असा विश्वास व्यक्त करून पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचा आहे, असे आवाहन प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी केले.

भाजपाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यासाठी फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी हरभजनसिंग ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, स्थानिक नगरसेवक योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड, नगरसेविका सुनीता गलांडे, शीतल शिंदे, शशी बोडके आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, यावेळी कोरोनाने सर्वांनाच मानसिकदृष्टया अस्थिर केले आहे. कोरोनाची चाचणी केल्याने लवकर निदान समजले तर आपल्याला वेळीच उपचार घेता येतील. कोरोनावर मात करायची असेल तर आपल्याला चाचण्या वाढवाव्या लागतील. त्यामुळे कोरोना चाचणी व्हॅनची संकल्पना राबविण्यात येत आहे. हरभजनसिंग यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.

पाटील म्हणाले की, आरटीपीसीआर टेस्ट ही केवळ ५०० रुपयांत केली जाणार असून रिपोर्ट सात तासात मिळणार आहे. तर अँटिजेन टेस्ट २५० रुपयांमध्ये केली जाणार असून रिपोर्ट अवघ्या १५ मिनिटांत मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची मोफत टेस्ट केली जाणार आहे. यामुळे पुढील उपचार घेता येणं शक्य होणार आहे.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले की, अंगावर दुखणे काढल्यामुळे काहींना थेट अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वेळ न घालवता चाचणी केली तर निदान लवकर होईल.

दिवसाला सहा हजार आरटीपीसीआर चाचण्या

पुण्यातील मतदारसंघात दोन दोन दिवस ही व्हॅन फिरणार असून दिवसाला आरटीपीसीआरची ६ हजार जणांच्या चाचण्या आणि १५०० अँटिजेन चाचणी करता येणार आहेत. मतदारसंघानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Punekars be careful, they want to win the match against Corona