यवत - यवत व परिसरात मागील दोन दिवसात पावसाने कहर केला आहे. दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. मागील महिनाभरात तीव्र उन्हाळा जाणवत होता. मे महिन्यात उन्हाच्या झळा आणखी सोसाव्या लागणार अशा मानसिकतेमध्ये सर्व शेतकरी व सर्वसामान्य नागरिक असताना अचानक पावसाने हजेरी लावली आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने आता सुरू असलेला पाऊस अवकाळी नसून मोसमी असल्याचा अंदाज येऊ लागला आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. जोरदार वाऱ्यासह रात्रभर पाऊस झाला. यामुळे सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. ओढे नाले भरून वाहत आहेत. यवत खुटबाव रस्त्यावरील रेल्वे मोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला होता. रात्रभर पाऊस झाल्यानंतर रविवारी दिवसभर देखील पावसाचा जोर कायम होता.
आजचा पाऊस / एकूण
यवत. ७५ / २१०
केडगाव. ७४/ २३७
पाटस. १०४/ २२७
दौड. १६० / २७९
रावणगाव ५६ / १९४
बोरीबेल ४२ / १२९
भिगवण ४४ / १७०