‘स्वच्छ’ अभियानात पुणे ‘उणेच’; ३१ व्या क्रमांकावर

By Admin | Updated: August 11, 2015 04:02 IST2015-08-11T04:02:37+5:302015-08-11T04:02:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेचे चार प्रकल्प रोल मॉडेल म्हणून स्वीकारण्यात आले आहेत.

Pune 'Uneich' in 'Clean' campaign; Ranked 31st | ‘स्वच्छ’ अभियानात पुणे ‘उणेच’; ३१ व्या क्रमांकावर

‘स्वच्छ’ अभियानात पुणे ‘उणेच’; ३१ व्या क्रमांकावर

- सुनील राऊत,  पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेचे चार प्रकल्प रोल मॉडेल म्हणून स्वीकारण्यात आले आहेत. मात्र, या अभियानाच्या अंमलबजावणीत महापालिकेचे गुणांकन घटले असून, या अभियानाच्या गुणांकनात महापालिकेस ३१ वा क्रमांक मिळाला आहे; तर देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील नवी मुंबई महापालिकेने स्थान मिळविले आहे. या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारनं देशातल्या ४७६ शहरांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात स्वच्छ भारत रँकिंगमध्ये म्हैसूर शहराने पहिला क्रमांक पटकावला, तिरुचिरापल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नवी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान देशभर सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील शहरांमध्ये तसेच गावांसाठी विविध स्वच्छता उपक्रम राबविले जात आहेत. त्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन आणि उघड्यावरील प्रात:विधीचे प्रकार बंद करण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्याअंतर्गत देशात हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार, देशातील स्वच्छ शहरांची क्रमवारी ठरविण्यासाठी केंद्र शासनाने ५ विभागांनुसार, गुणांकन केले आहे. त्यात पाणीपुरवठा, पावसाळी जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, मैलापाणी शुद्धीकरण, तसेच उघड्यावरील प्रात:विधीचे शहरातील प्रमाण आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, केंद्राच्या पथकाने महापालिकेच्या या कामांची पाहणीही केली होती. त्यात पुणे देशातील ३१ वे स्वच्छ शहर ठरले आहे.
महापालिकेने शहरासाठी राबविलेल्या चार प्रकल्पांची दखल घेतली असून, त्याची माहिती मागील महिन्यात मागविण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेकडून महिलांसाठीची स्वच्छतागृहे, एक घर एक स्वच्छतागृह, स्वच्छतेसाठी सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) या प्रकल्पांसह स्वच्छतागृहाचे डिमॉलिश अँड रिकन्स्ट्रकशन या प्रकल्पाचा अभ्यास या योजनेत करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे देशातील आठवे महानगर म्हणून विकसित होत असताना, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचरा समस्येमुळे मात्र पुणे शहर स्वच्छतेबाबत ३१ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. या गुणांकनावर स्मार्ट सिटीतील समावेशही अवलंबून असणार आहे.

या स्वच्छ शहरांची क्रमवारी ठरविण्यासाठी केंद्र शासनाने घालून दिलेल्या पाच निकषांवर शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली असली तरी, यात शहरांचा विस्तार तसेच दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्मिती लक्षात घेतली गेली नसल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्या दहा शहरांमध्ये आलेली पहिली तीन शहरे ही पुणे महापालिकेच्या तुलनेत खूपच लहान आहेत, तर त्यांचा दैनंदिन कचराही सुमारे ५०० टनांच्या आसपास आहे. याउलट पुणे महापालिकेचा कचरा या शहरांच्या तिप्पट म्हणजे १५०० टनांच्या आसपास आहे. याशिवाय पहिल्या दहामध्ये बेंगलोर, नवी दिल्ली, नवी मुंबई या शहरांचा विकास अतिशय नियोजनबद्ध स्वरूपात झालेला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प. पावसाळी जलवाहिन्यांचे जाळे या स्वरूपातील कामांमध्ये महापालिकेचे गुणांकन आपोआपच इतर शहरांच्या तुलनेत कमी होते. याउलट घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहांच्या उभारणीत महापालिकेने आघाडी घेतलेली आहे. पुढील वर्षी आणखी नवीन प्रकल्प उभे राहत असल्याने महापालिकेची क्रमवारी वाढेल, अशी अपेक्षाही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

स्वच्छ शहरांची क्रमवारी पाहता हैदराबाद, अहमदाबाद शहरांपेक्षा पुढे आहे. या अभियानातील दोन प्रमुख घटक पाहता, प्रत्येक घरात १०० टक्के स्वच्छतागृहांची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून ती २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण होईल. डिसेंबर २०१६ पर्यंत कचरानिर्मितीच्या ठिकाणाहून तो संकलित करण्यापासून ते प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत महापालिका सक्षम झालेली असेल, पालिकेचे प्रकल्प पूर्ण झालेले असतील. त्यामुळे २०१७ पर्यंत स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे पहिल्या क्रमांकावर असेल, या दृष्टीने पालिकेकडून नियोजन करण्यात आले असून त्यानुसार कामही सुरू करण्यात आले आहे.
- कुणाल कुमार, (महापालिका आयुक्त)

Web Title: Pune 'Uneich' in 'Clean' campaign; Ranked 31st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.