पुणे : पुणे-सातारा महामार्गावर आवश्यक असलेल्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले. परंतु वाढत्या वाहनांमुळे त्याची रुंदी कमी पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील भुयारी मार्गाची रुंदी वाढवा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना रविवारी दिले. बैठकीनंतर भूगाव बायपासचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री गडकरी यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची रविवारी दुपारी बैठक घेतली. दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महामार्गावर होणाऱ्या कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. तसेच, हिंजवडीपासून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नव्याने भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. त्याची पाहणी करून नवीन भुयारी मार्ग तयार करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय भूगाव बायपासचे काम प्रत्येक महिने रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने भुयारी मार्ग करावे. त्यासाठी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जमीन संपादन करून द्यावी, अशी सूचना त्यांनी दिली.