पुणे : सिंहगड रस्त्यावर नांदेड फाट्यापासून पानमळ्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागोजागी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीला निमंत्रण दिले जात आहे. दुसरीकडे, राजाराम पूल चौक ते फनटाइम थिएटर दरम्यानचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने परिसरातील व्यावसायिकांना पुलाखाली रान मोकळे झाले आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या खाली रस्ता दुभाजकाला लागून दोन्ही बाजूंनी पदपथालगत दुचाकी व चारचाकी वाहने व टेम्पो उभे केले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना याकडे वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासन मात्र कानाडोळा करत आहेत.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. शिवाय सिंहगड, खानापूर, पानशेत या परिसरातूनही शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम थिएटर या दरम्यान दोन उड्डाणपूल उभारले आहेत. एक उड्डाणपूल राजाराम चौकात आणि दुसरा विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर. राजाराम पूल चौकातील आणि विठ्ठलवाडी ते फनटाइम या दरम्यानचे उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. उड्डाणपुलाचा शेवटचा टप्पा असलेला माणिक बाग ते विठ्ठलवाडी हा उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
उड्डाणपूल पूर्णपणे वाहतुकीला खुला झाल्याने वाहनचालकांची व नागरिकांची कोंडीतून सुटका झाली आहे. मात्र, नांदेड फाट्यापासून कॅनॉलपर्यंत, त्यानंतर धायरी फाट्यापासून राजाराम पुलापर्यंत आणि पुढे पानमळ्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पदपथाला लागून बेकायदेशीरपणे चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. बेकायदेशीर पार्किंगमुळे धायरी फाटा ते वडगाव पूल, माणिक बाग ते आनंद नगर ते विठ्ठलवाडी आणि नवशा मारुती ते पानमळा यादरम्यान जागोजागी वाहतूक कोंडी होते. सिंहगड रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे पार्किंग केल्या जाणाऱ्या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग गाड्या वारंवार फिरत असतात. अशा दुचाकींवर कारवाईही केली जाते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या चारचाकी वाहनांकडे मात्र वाहतूक पोलिस डोळेझाक करतात. दुसरीकडे पदपथावर फळभाज्या विक्रेते आणि दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंग
सिंहगड रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलाखाली रस्ता दुभाजकाला लागून दोन्ही बाजूंना व्यावसायिकांची चारचाकी वाहने व टेम्पो बेकायदेशीरपणे पार्किंग केले जात आहेत. तसेच राजाराम पुलाच्या शेजारी नव्याने दुकाने सुरू झाल्याने त्या दुकानांत येणाऱ्या ग्राहकांची चारचाकी वाहने राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या अरुंद रस्त्यावरच पार्किंग केली जातात. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते.