आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:52+5:302021-05-15T04:09:52+5:30

एखाद्या शहरात दर हजार नागरिकांमागे किती बेड उपलब्ध आहेत, हवा आणि पाण्याची गुणवत्ता कशी आहे, सांडपाणी व्यवस्था कशी आहे ...

Pune tops the country in health infrastructure | आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात अव्वल

आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात अव्वल

एखाद्या शहरात दर हजार नागरिकांमागे किती बेड उपलब्ध आहेत, हवा आणि पाण्याची गुणवत्ता कशी आहे, सांडपाणी व्यवस्था कशी आहे यावर शहरांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात आले आहे. यामध्ये चाळीस टक्के गुण हे हॉस्पिटलमधील बेडच्या संख्येला दिले होते.

हाऊसिंग डॉट कॉमने म्हटले आहे की आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विचार केला तर पुणे शहरात सर्वाधिक आहे. पुण्यात दर हजार लोकसंख्येमागे ३.५ हॉस्पिटल बेड उपलब्ध आहे. भारत देशाच्या सरासरीचा विचार केला तर ही मोठी संख्या आहे. भारताचा विचार केला देशात दर हजार लोकसंख्येमागे सरासरी अर्धा बेड आहे. सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही रुग्णालये मिळून हा आकडा १.४ पर्यंत जातो. भारतामध्ये दर हजार लोकसंख्येमागे डॉक्टरांची संख्याही अत्यंत कमी म्हणजे ०.८६ इतकी आहे.

आरोग्य सुविधांत टॉपवर असलेल्या पुण्यात इझ ऑफ लिव्हींग, पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा शाश्वत विकासासाठीचा प्रयत्नही चांगला आहे.

या पाहणीत अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी दर हजार लोकसंख्येमागे ३.२ बेड आहे. बंगळुरूमध्ये बेडची उपलब्धता चांगली असली तरी लिव्हिंग इंडेक्स, महापालिकेची कामगिरी, हवा आणि पाण्याची गुणवत्ता या निकषांवर शहराची कामगिरी खालावलेली आहे.

दिल्ली-एनसीआर म्हणजे राजधानी दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मिळून बनलेल्या भागात यादीतील इतर शहरांच्या तुलनेत अत्यंत वाईट आरोग्य सुविधा आहे. याचे कारण म्हणजे हवा आणि पाण्याची गुणवत्ता वाईट आहे. सांडपाण्याची व्यवस्था नाही. महापालिकांची कामगिरीही चांगली नाही.आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा यामध्ये पुणे शहर नेहमीच अव्वल स्थानी राहिलेले आहे. गरजेनुसार हॉस्पिटलमधील सुविधा वाढवण्यात प्रायव्हेट हॉस्पिटलचा देखील पुढाकार राहिला आहे. पुण्यातील सरकारी व प्रायव्हेट मेडिकल कॉलेज यांचा ही ह्यात मोठा सहभाग आहे ,तसेच बाकी शैक्षणिक क्षेत्रातील पुण्याची असलेली प्रगती, पॅरामेडीक सेवांसाठी सुद्धा उत्तम दर्जाचे सेवाबळ उपलब्ध करते. तसेच आधुनिकतेकडे प्रवास करत असताना सुद्धा आपली पारंपरिक ओळख आणि निसर्गप्रेम जपून ठेवलं आहे. त्यामुळे दिल्ली, बंगळुरू इत्यादी शहरांना मागे टाकून पुण्याने बाजी मारली ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

आपल्या पुणे शहराला प्रथम क्रमांक मिळावा यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. याचे कारण म्हणजे येथील वैद्यकीय शाखेचे अथक परिश्रम, सांडपाण्याची उत्तम सोय आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम गुणवत्ता. पुण्यातील इज ऑफ लिविंग व सर्व पुणेकरांच्या सहकार्याने आरोग्याच्या आधारभूत सुविधांमध्ये आपणास इतर शहरांपेक्षा जास्त प्रगती दिसते. याच कारणाने केवळ पुण्यातील नव्हे तर इतर अनेक जवळील गावातील कोविड रुग्णांचे प्राण आम्ही वाचवू शकलो. इतर दिल्ली, नोएडासारख्या शहरांनी पुण्याचे आदर्श ठेवावे. आणि कोविडसाठी जास्तीत जास्त बेड उपलब्ध करावेत असे मला वाटते.

डॉ. पराग संचेती, संचालक, संचेती हॉस्पिटल

Web Title: Pune tops the country in health infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.