पुणे :शिवशाही बसचे दरवाजे लावले तरी काही वेळानंतर एअर प्रेशर कमी झाल्यावर दरवाजे आपोआप उघडले जातात. त्याचे मूळ कारण म्हणजे मेंटेनन्स न राखल्यामुळे शिवशाही बसचे दरवाजे असुरक्षित आहेत.
मंगळवारी तरुणीवर बलात्काराची घटना शिवशाही बसमध्ये घडली. यावेळी बसचा दरवाजा उघडा असल्यामुळे या बसच्या दरवाज्याच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. परंतु, चालकाने ड्यूटी संपल्यावर बसचा दरवाजा आणि खिडक्या बंद करूनच जावे, असा नियम आहे. परंतु, बसच्या दरवाजात तांत्रिक अभाव असल्यामुळे चालकाने तरी काय करायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे विभागात जवळपास ४० पेक्षा जास्त शिवशाही बस आहेत. गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
देखभाल दुरुस्तीचा अभाव
राज्य परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या शिवशाही बसमार्गावर सोडताना योग्य देखभाल दुरुस्ती न करता सोडता येते. याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे या बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडणे, वेगाने न पळणे यासंबंधी तक्रारीचे प्रमाण वाढले आहेत. आता दरवाजा उघडा राहिल्यामुळे बलात्काराची घटना झाल्यामुळे शिवशाही बसचे दरवाजे असुरक्षित असून, त्याची देखभाल दुरुस्तीची मागणी होत आहे.