विद्यार्थी अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षभरानंतर गजाआड, पुणे एलसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:31 IST2018-03-27T11:31:09+5:302018-03-27T11:31:09+5:30
चाकण येथील विद्यानिकेतन शाळेतील 5 वर्षाच्या विद्यार्थी अपहरण प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पुणे एलसीबीच्या पथकाने नाशिकमधून अटक केली आहे.

विद्यार्थी अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षभरानंतर गजाआड, पुणे एलसीबीची कारवाई
चाकण : चाकण येथील विद्यानिकेतन शाळेतील 5 वर्षाच्या विद्यार्थी अपहरण प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पुणे एलसीबीच्या पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्याच्या अपहरण प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी संतोष रामभाऊ कड ( वय २३ वाशिम) याला पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तब्ब्ल एक वर्षाने नाशिकमधील भोयेगाव (चांदवड) येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यास चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पुणे एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील विद्यानिकेतन स्कूलमधील 5 वर्षीय एका विद्यार्थ्याचे 24 मार्च 2017 रोजी अपहरण करण्यात आले होते. संदीप भाऊराव ठोकळ ( वय 30) व संतोष रामभाऊ कड ( वय 23) या दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत विद्यार्थ्यास संतोषने 10 दिवस ठोकळ याच्या मुळशी तालुक्यातील भूगाव येथील घरी डांबून ठेवले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून 15 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी चाकण पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुलाला कोणताही धोका न होता आरोपीला ताब्यात घेतले. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी संतोष कड हा फरार झाला होता.
पुणे ग्रामीण पोलीस एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक महेश मुंडे, हवालदार सुभाष घारे यांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील एका नर्सरीमधून ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.