Pune News: डिजिटल व्यवहारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही प्रचंड वाढले आहेत. दररोज कुठे ना कुठे मोठी आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत असून, पुण्यात चक्क पोलीस कर्मचारीच याला बळी ठरला आहे. स्कॅन केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला २.३ लाखांचा फटका बसला.
पुणे ग्रामीण पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. पुण्याजवळील सासवड येथे ही घटना घडली.
माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्या बेकरीच्या दुकानातून पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला. त्यावेळी बँक खात्यातून १८,७५५ रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना आला. अचानक इतके पैसे बँक खात्यातून कट झाल्याने त्यांनी लगेच दुसरे बँक खात्यातील रक्कम चेक केली.
दुसरे बँक खाते चेक केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला धक्काच बसला. कारण त्या खात्यातून १२,२५० रुपये कट झाले होते. बँक खात्यात केवळ ५० रुपयेच शिल्लक राहिले होते.
त्याचबरोबर गोल्ड लोन असलेल्या बँक खात्यातून व्यवहाराबद्दल पोलीस कर्मचाऱ्याला एक ओटीपी आला. पण, त्यांनी तो शेअर केला नाही. तरीही त्यांच्या खात्यातून १.९ लाख रुपये कट झाले होते.
सायबर ठगांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरूनही १४ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस कर्मचाऱ्याने लगेच बँक खाती गोठवल्याने हा व्यवहार झाला नाही.
इतके पैसे कसे गेले?
तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सायबर ठगांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या APK फाईल्सच्या माध्यमातून बँक खाते आणि क्रेडिट कार्डचा अक्सेस घेतला आणि पैसे काढून घेतले.
पोलीस कर्मचाऱ्याने सायबर गुन्हेगारांनी पाठवलेल्या कुठल्या तरी लिंकवर क्लिक केलं असेल, त्यामुळे त्यांना मालवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खात्यातून पैसे काढले असावे, असा संशयही पोलिसांना आहे.