पुणे - काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार तर अस्वस्थ झाले आहेतच, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही जाहीर नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केली आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे, असे म्हणत खुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नाराज भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता ही धंगेकर यांची शिवसेनेत असल्यापासूनची ओळख आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतरही त्यांनी आपली ही ओळख मिटू दिली नाही. ससूनमधील अमली पदार्थ तस्करीचे ललित पाटील प्रकरण असो किंवा अन्य कोणती प्रकरणे, त्याविरोधात त्यांनी आमदार असूनही थेट रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आंदोलन केले, धरणे धरले. त्यामुळेच की काय पण, काँग्रेसमधून लोकसभा, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ते पराभूत झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या शिवसेनेत सामावून घेतले आहे. त्याच्या अटी, शर्ती अद्याप गुलदस्त्यात असल्या तरी त्यांचा सन्मान ठेवला जाईल असे शिंदे यांनी त्यांचे स्वागत करतानाच जाहीर केले.त्यातून शिंदेसेनेचे पुण्यातील धुरा पक्ष स्थापन झाल्यापासून सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर, ‘आता यांचे नेतेपद स्विकारायचे का?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी आपली अस्वस्थता लपवून ठेवली आहे, मात्र भारतीय जनता पक्षाच्या कायकर्ते, पदाधिकारी यांनी ती उघड करण्यास सुरूवात केली आहे. विशेषत: कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते फारच नाराज आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा धंगेकर यांच्याबरोबर बराच संघर्ष झाला. त्यात भाजपचा पराभव झाला.
हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच पुढे सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी याची परतफेड केली. त्यावेळीही प्रचार करताना त्यांचा धंगेकर यांच्याबरोबर जोराचा राजकीय संघर्ष झाला. लोकसभा निवडणुकीतही तेच झाले. आता त्याच धंगेकरांबरोबर सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसे घ्यायचे? असा या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे.मिडिया विभागाचे पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांनी याविषयीच्या आपल्या भावना उघडपणे बोलून दाखवल्या. संघर्ष केला म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच पुर्ण ताकतीने काम करत होतो. आता ते शिंदेसेनेत आले. तो पक्ष आमचा सहयोगी पक्ष आहे. म्हणजे प्रत्येक सरकारी योजना राबवताना, मतदारांसमोर जाताना आता प्रत्येक वेळी ते आमच्याबरोबर असणारच, ते सहन कसे करायचे? असे तुळजापूरकर यांचे म्हणणे आहे. मात्र पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने पक्ष सांगेल ते मान्यच आहे असेही ते म्हणाले. त्याशिवाय कसब्यातील अन्य पदाधिकाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीत काय करायचे? युती म्हणून निवडणूक लढवली गेली, धंगेकर यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तर, त्यांचा प्रचार करायचा का असा प्रश्न हे कार्यकर्ते करतात.विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे. एकनाथ शिंदे यांना धंगेकर यांच्यातील राजकीय गूण पटले असतील, त्यांच्यामुळे पुण्यात आपला पक्ष वाढणार आहे असे वाटत असेल तर त्यात गैर काही नाही, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, ते मत अनुभवातून तयार झाले आहे असे पाटील यांचे म्हणणे आहे.