पुणे : शहरातील उच्चभ्रू वर्तुळात मोठ्या थाटात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खराडी येथील एका आलिशान फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. त्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा परिसरातील पंचतारांकित स्टे बर्ड हॉटेलमध्ये झाली. या हॉटेलला रात्री ३ वाजेपर्यंत पार्टीची परवानगी होती. यानंतर सर्वजण खराडीतील एका फ्लॅटमध्ये गेल्याची माहिती आहे. याच फ्लॅटमध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, गांजा, हुक्का पॉट आदी प्रतिबंधित वस्तू आढळून आले.
रेडिसन हॉटेलच्या मागील एका इमारतीत सुरू असलेल्या या पार्टीत दोन तरुणी आणि पाच पुरुष उपस्थित होते. या रेव्ह पार्टीत आणखी तीन महिलाही होत्या, मात्र छाप्यावेळी त्या तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्रांजल खेवलकरसह इतर आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. खेवलकर याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली असून, सातही जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास करण्यात आली असून, शहरातल्या उच्चभ्रू वर्तुळातील रेव्ह पार्ट्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.