पुणे - शहरातील उच्चभ्रू वर्तुळात मोठ्या थाटात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. खराडी येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटासह एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांना ही माहिती नेमकी कशी मिळाली, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. यासंदर्भात आज पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पार्टीमध्ये कोकेन, दारू, बिअर बॉटल्स, हुक्का व त्याचे साहित्य सापडले. एकूण २.७ ग्रॅम कोकेन, १० मोबाईल फोन्स, तसेच इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. आरोपींमध्ये ५ पुरुष आणि २ महिला सहभागी असल्याचे उघड झाले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
प्रांजल खेवलकरसह सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडीप्राप्त माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व सातही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.