Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:52 IST2021-12-13T15:51:24+5:302021-12-13T15:52:49+5:30
ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण
पुणे : राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात कोरोनाचे ६४४१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैैकी पुणे जिल्ह्यात १६६७ रुग्ण आहेत. म्हणजेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैैकी २५ टक्के सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे. मुंबईत सर्वाधिक १७७४ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या राज्यात केवळ मुंबई आणि पुणे जिल्ह्यात १५०० हून अधिक सक्रिय रुग्ण, तर ठाणे जिल्ह्यामध्ये १००० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५०० हून कमी आहे. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २ सक्रिय रुग्ण आहेत. वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के इतके आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका पुण्याला बसला आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. यावर्षी दुस-या लाटेतही एप्रिल-मे महिन्यात पुण्याने कोरोनाचा उद्रेक अनुभवला. मे महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. अद्यापही रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना ओसरतानाची चिन्हे दिसत असतानाच नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटने धास्ती निर्माण केली. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये ११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
जानेवारी महिन्यात तिस-या लाटेचा सामना करावा लागू शकेल, असा अंदाज गणितीय मांडणीच्या आधारे बांधला जात आहे. कोरोनाची कितवीही लाट आली किंवा कोणत्याही प्रकारचा नवीन व्हेरियंट आला तरी लसीकरण हे सध्याचे एकमेव उत्तर असल्याने नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण पूर्ण करुन घेण्यास सांगितले जात आहे.
आतापर्यंत ११ लाख ३८ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ८८ लाख २२ हजार ११३ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैैकी ११ लाख ५९ हजार ६२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैैकी ११ लाख ३८ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येचे जिल्हे
मुंबई : १७७४
पुणे : १६६७
ठाणे : १०६०
सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्येचे जिल्हे
वर्धा : ३
वाशिम : ३
धुळे : २