हडपसर : हडपसरमधील पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित झाले. मात्र, पावसाळ्यात पोस्ट ऑफिससमोर इतके पाणी साचते की चालत ऑफिसमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये येताना बोट घ्यायची का? असा सवाल हडपसर, ससाणेनगर नागरी कृती समितीच्यावतीने केला आहे.
हडपसर गाडीतळ येथे बंटर शाळेच्या प्रांगणात २२ मार्च २०२४ या दिवसापासून हडपसर पोस्ट ऑफिस कार्यरत झाले. हडपसरगाव येथून स्थलांतरित झालेल्या पोस्ट ऑफिसमध्ये महानगरपालिकेकडे तक्रार करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. पावसाळ्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी या कार्यालयाच्या परिसरात साचत आहे.
गेल्यावर्षी हडपसर पोस्ट ऑफिसकडून पुण्यातील मुख्य कार्यालयात लेखी माहिती पाठवण्यात आली. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनाही लेखी तक्रार देण्यात आली, परंतु यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना येथील परिस्थितीबाबत तक्रार केली होती, त्यांनी प्रत्यक्ष येऊन येथील पाहणी केली. मात्र, प्रश्न सोडवला नाही. कालपासून मोठ्या प्रमाणात हडपसरमध्ये पाऊस झाल्याने आज पुन्हा एकदा या ठिकाणी तळे साचलेले आहे. - मयूर फडतरे, नागरिकस्थानिक नागरिकांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने येथील पाहणी केली जाईल आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी काय करता येईल याची तपासणी करून येत्या दोन दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. - प्रवीण कळमकर, कनिष्ठ अभियंता लेखी तक्रार करूनसुद्धा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने अद्याप प्रश्न सोडवलेला नाही. आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. - मीनल क्षीरसागर, पोस्ट मास्टर, हडपसर पोस्ट कार्यालय