पुणे - पुण्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज (गुरुवारी) सकाळपासून जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये संततधार सुरू झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिला आहे.दुपारी चार ते सहा या वेळेत पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक पाऊस झाला असून या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनं चालवताना अडचणी आल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. पाषाण, शिवाजीनगर, मगरपट्टा परिसरासह अनेक भागांत पाण्याखाली गाड्या गेल्याचे चित्र या व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, पुण्यातील नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.