पुणे - पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून, याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे.
पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये वाहतुकीची वाट पाहत असताना, एका २६ वर्षीय महिलेवर थांबलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याचा आरोप असलेल्या या घृणास्पद गुन्ह्याचा आयोगाने तीव्र निषेध केला आहे. आरोपी सध्या फरार आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणीच्या उपाययोजनांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या घटनेची निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी सुनिश्चित करा, विलंब किंवा निष्काळजीपणाला जागा सोडू नका. पीडितेला वैद्यकीय मदत, मानसिक समुपदेशन आणि तिच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत द्या, आरोपीला लवकरात लवकर अटक करा आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हेगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करा, तसेच तीन दिवसांच्या आत आयोगाला एफआयआरची प्रत असलेला कारवाई अहवाल सादर करा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.