पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर सहा ते सात गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर पोलिसांनी आता त्याच्या आर्थिक हालचालींवर लक्ष केंद्रित केले. निलेश घायवळचा मुलगा सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहे. त्याच्या या उच्च शिक्षणासाठी लागणारी रक्कम किती आणि कोणत्या माध्यमातून भरली गेली, याचा तपासा आता पोलीस करणार आहेत. यासाठी पुणे पोलिसांकडून संबंधित परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार करण्याची तयारी सुरू आहे. या पत्रातून विद्यापीठाकडून घायवळच्या मुलाच्या शिक्षणाचा आर्थिक स्रोत, फी भरण्याची पद्धत आणि खाते तपशील मागवण्यात येणार आहेत.
कोथरुड गोळीबारानंतर नीलेश घायवळवर गुन्हे दाखल झाल्यानंतर एकामागोमाग सहा ते सात नवे गुन्हे समोर आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याची आर्थिक कोंडी करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची अशी एकूण १० बँक खाते गोठवण्यात आली आहेत. याशिवाय काही मालमत्ता देखील सील करण्यात आली आहे. गायवळ टोळीच्या पैशाचा स्त्रोत बंद करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
याविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याने गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठा फंड उभारला आहे. त्याचाच मागोवा घेण्यासाठी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती परदेशी विद्यापीठाकडून मागवली जाणार आहे.
कोथरूडमधील त्या दहा सदनिका सील करण्याचे आदेश...
निलेश घायवळने कोथरुड परिसरातील एका अपार्टमेंटमधील दहा सदनिकांवर बेकायदेशीर ताबा मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या सदनिका भाड्याने देऊन त्यातून मिळणारा आर्थिक लाभ घायवळ घेत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सर्व सदनिका खाली करून सील करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.