मंचर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध सर्वपक्षीय आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, गेल्या २५ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांवर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादीसमोर यंदा पहिल्यांदाच तगडे आव्हान उभे राहणार आहे.
आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागा आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पंचायत समितीचे सभापतीपद कधीही विरोधकांकडे गेले नाही. मात्र, राज्यातील सत्तांतर व पक्षबदलांच्या लाटेमुळे तालुक्यातील राजकीय गणित बदलले आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीत आमने-सामने आलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील आता एकाच पक्षात आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या रणनीतीतील महत्त्वाचे नाव असलेले माजी सभापती देवदत्त निकम आता वळसे पाटील यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.
आघाड्यांची लगबग आणि नवे समीकरण
या निवडणुकीत अनपेक्षित आघाडी व युती होण्याची शक्यता आहे. भाजप राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत देत आहे. शिंदेसेना राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत असून, शरद पवार गटाशी संधान साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्धवसेना स्वतंत्र शक्ती दाखवण्याच्या तयारीत असून, शिंदेसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाबरोबरच्या चर्चेला गती दिली आहे. जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी ‘शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढतील’, असे जाहीर केले. जरी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी लगेच इन्कार केला असला, तरी त्रिपक्षीय आघाडीचे धुके अजूनही कायम आहे.
राष्ट्रवादीची आतली परीक्षा
राष्ट्रवादीकडून मेळावे, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक जुने चेहरे इच्छुक असून, शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मात्र, जुन्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः निवडणूक गांभीर्याने घेत असून, अलीकडील मेळाव्यांमधून ‘विधानसभा निवडणुकीचा वचपा काढू’, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
विरोधकांची गुप्त रणनीती
विरोधकांनी गुप्त बैठकांचे सत्र सुरू केले आहे. रणनीती गुलदस्त्यात ठेवत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. भाजपने अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खाते उघडले नसले, तरी राष्ट्रवादीसोबत मिळून तालुक्यात प्रवेश करण्याची रणनीती आखत आहे. आरक्षणानंतर काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याने अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. दिवाळीनिमित्त फ्लेक्स, फराळ वाटप आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढल्याचे चित्र सर्वच गटांत दिसून येत आहे.
पारगाव-जारकरवाडी गटात हाय व्होल्टेज लढत
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा घरचा गट सर्वसाधारण आल्याने या गटाकडे सर्वांचे लक्ष आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीकडून माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच अरुण गिरे सक्रिय आहेत. वळसे पाटील यांची कन्या पूर्वा हिचे नावही चर्चेत आहे. विरोधकांकडून शिंदेसेनेचे निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. या गटात हाय व्होल्टेज लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
आढळराव पाटील यांची भूमिका निर्णायक
गेल्या २० वर्षांपासून एकमेकांविरोधात लढलेले दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील आता एकाच पक्षात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आढळराव यांच्या मदतीमुळे वळसे पाटील यांना विजय मिळाला होता. पेठ-घोडेगाव गटावर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, आता दोघेही राष्ट्रवादीत असल्याने प्रथमच घड्याळ चिन्ह विजयी होईल, अशी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा आहे. जि. प.ची जागा महिलांसाठी राखीव असून, पंचायत समितीच्या दोन्ही जागा सर्वसाधारण आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपकडून डॉ. ताराचंद कराळे (जिल्हा सरचिटणीस) हे प्रबळ इच्छुक आहेत.
जागा वाटपाची चर्चा
आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिंदेसेना व उद्धवसेना या तीन पक्षांमध्ये चर्चा होऊन जागा वाटप निश्चित झाल्याचे बोलले जाते. त्यानुसार पवार गट व शिंदेसेनेला प्रत्येकी दोन जिल्हा परिषद गट व उद्धवसेनेला एक जिल्हा परिषद गट दिला जाईल, असे सांगितले जाते. याला दुजोरा मिळत नसला तरी इच्छुक उमेदवारांवर नजर टाकली तर नक्कीच काहीतरी शिजत असल्याचे दिसते. मंचर शहरात नगर पंचायत अस्तित्वात आल्याने गट व गणांची रचना बदलली आहे. नवीन गावे जोडली गेल्याने उमेदवारांना प्रचारात कसरत करावी लागणार आहे.
२०१७ पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद ५ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस ४
शिवसेना १
पंचायत समिती १० जागा
राष्ट्रवादी काँग्रेस ६
शिवसेना ३
अपक्ष १
Web Summary : Ambegaoon's Zilla Parishad election sees rising political heat. An all-party alliance challenges NCP's dominance. Political shifts and new alliances emerge, making the upcoming election highly competitive.
Web Summary : अम्बेगांव जिला परिषद चुनाव में राजनीतिक सरगर्मी बढ़ रही है। एक सर्वदलीय गठबंधन एनसीपी के प्रभुत्व को चुनौती दे रहा है। राजनीतिक बदलाव और नए गठबंधन उभर रहे हैं, जिससे आगामी चुनाव बेहद प्रतिस्पर्धी हो गया है।