- अशोक काकडेलोहगाव :पुणे महापालिकेच्या विमाननगर-सोमनाथनगर प्रभाग क्र. ३ मध्ये विकासाची दोन टोकं स्पष्टपणे दिसून येतात. एका बाजूला सुसज्ज, प्रशस्त आणि विकसित विमाननगर सोमनाथनगर, तर दुसरीकडे दुर्गम, दुर्लक्षित व अविकसित लोहगाव-वाघोली आहे. कर रचना समान, परंतु विकासकामांमध्ये प्रचंड असमानता असल्याने लोहगाव-वाघोली परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विमाननगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधा उत्तमरीत्या उपलब्ध आहेत; तर लोहगाव-वाघोलीमध्ये या मूलभूत सुविधांची टंचाई आहे. त्यामुळे जमिनींचे बाजारभाव आणि घरभाड्यांमध्येही मोठी तफावत निर्माण झाली आहे. महापालिकेत समाविष्ट होऊनही या भागांचा विकास कागदावरच अडकलेला आहे.
सोमनाथनगर, विमाननगर हा भाग सुसज्ज, प्रशस्त आणि विकसित असा तर दुसरीकडे लोहगाव, वाघोली दुर्गम, दुर्लक्षित, अविकसित असा भाग आहे लोहगाव-वाघोलीची जनता पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे आस लावून बसली आहे, महापालिकेत समाविष्ट होऊन ७ वर्षे झालीत. मात्र लोहगाव वाघोली परिसरातील नागरिक आजही मूलभूत सुविधांच्या विवंचनेत जगत आहेत. या परिसरात ड्रेनेजचे काम अजिबात झालेले नाही. पावसाळा आला की या भागात सांडपाण्याचे नाले ओसंडून वाहतात. रस्त्यांवर खड्डे आणि वाहतूककोंडी होत असते, तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या असतेच. कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईनचा अभाव आणि असुरक्षित, खडतर रस्ते या समस्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत आहे. लोहगावच्या जुन्या हद्दीमध्ये पाणी पोहोचले असले, तरी दिवसाआड पाणी मिळते. तेही कमी दाबाने मिळत आहे. नवीन हद्दीमध्ये तर आठ-आठ दिवसाला पाणी येते व कधी येतही नाही. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. पठारे वस्ती, लेक व्ह्यु सिटी, जनार्दननगर अशा अनेक भागांत पाण्याची, ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवल्याने तेथे रस्ते अस्तित्वातच नाहीत. रस्ते, पाणी, वीज, पथदिवे, खेळाची मैदाने, विरंगुळा केंद्र या भागात पोहोचलेच नाहीत. विजेच्या प्रश्नालाही येथील जनतेला तोंड द्यावे लागत आहे. लोहगाव-वाघोली सांडपाण्याचा नाला आहे. त्याचे बांधकाम अर्धवट असून रस्ताही अरुंद आहे. त्यामुळे नेहमी येथे वाहतूककोंडी होते. रस्त्यावर लोहगाव-वाघोली परिसरात नाले बुजविण्याचे उद्योग जोरात सुरू असतात.
दुसरीकडे विमाननगर, सोमनाथनगरमध्ये पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होतो. अस्तित्वात असलेल्या सोयीसुविधांची देखरेख, सेवा व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाली असून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याच भागाच्या शेजारी असलेल्या संजय पार्कमध्ये अरुंद रस्ते असून अतिक्रमण फोफावले आहे. त्यामुळे येथूनवाहन चालविणे अवघड होते. लोहगाव परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले असून सर्वत्र कचरा दिसत आहे. त्यामुळे रस्त्याने जाताना दुर्गंधीतून जावे लागते.वडगाव शिंदेपासून, भावडी रस्त्यापर्यंत आणि वाघोली हा भाग विरळ असला तरी वाघोली रस्त्यावरील संतनगर, दादाची वस्ती, डायमंड वॉटर पार्क, साईधाम कॉलनी, योजना नगर, डिफेन्स कॉलनी ते वाघेश्वर मंदिरापर्यंत डाव्या बाजूला दाट वस्ती आहे. काही भागात रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, पथदिवे या सुविधा नाहीत.
प्रभागाच्या रचनेमध्ये मोठे केले बदल२०१७ साली मतदार संख्या ८४ हजार ६७१ होती. त्यापेक्षा प्रभागाची व्याप्ती ९२ हजार ४१० इतकी वाढली आहे. २०१७ला अनुसूचित जातीची संख्या १९८३३, तर अनुसूचित जमाती १४६१ होती. उद्याच्या निवडणुकीत अनु. जाती १००८२ तर अनु. जमाती १०१७आहे. आधीच्या निवडणुकीत खेसे पार्क कलवड प्रभाग ३ला जोडलेला होता. आता तो वगळून प्रभाग १ ला जोडण्यात आला. लोहगाव वाढीव हद्द तसेच वाघोलीची विरळ वस्ती जोडल्याने तसेच विमानतळामुळे क्षेत्रफळामध्ये मोठ्या असलेल्या या प्रभागाच्या रचनेमध्ये बदलही मोठे करण्यात आले. लोहगावातील गुरुद्वारा सोसायटी, लोहगाव विमानतळ, विमाननगर, फिनिक्स मॉलकडून एअरफोर्स कॅम्पस, पुरू सोसायटी, संजय पार्क, गंगा हॅम्लेटपासून इन ऑर्बिट मॉल, सोमनाथ नगर, क्लोव्हर पार्क, प्राईड रिजेन्सी, रोहन मिथिला सोसायटी, भैरवनाथ तलाव परिसरापासून श्रीराम लोटस सोसायटी, माथाडे वस्ती, संतनगरपर्यंत, तसेच साईथाम कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनीपासून पूर्वरंग सोसायटीपर्यंत भागांचा यात समावेश केला आहे.
आमच्या भागातील रहदारीची वाट अत्यंत बिकट झाली असून, पिण्याचे पाणी कधी उपलब्ध होते, याची आम्ही वाट बघतोय. - रेखा खांदवे, पवार बस्ती
कर्मभूमीनगरमध्ये ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू असतो. रात्री-अपरात्री वीज जाते. महावितरणने तारा अंडरग्राऊंड कराव्यात. - प्रा. प्रकाश दळवी, कर्मभूमीनगर
माउंट सेंट पॅट्रिक, लोहगाव या मुलांच्या शाळेच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. धड शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसहित पालकांनाही अत्यंत त्रास होतो. - मेघा पवार, कर्मभूमीनगर
भावडी परिसरात खदान असल्याने भावडी रोडवर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रचंड धुरळा उडतो व प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे अपघातांचे प्रमाण खूप वाढले असून, येथील नागरिकांना जीव धोक्यात घालूनच वाहने चालवावी लागतात. - संजय कड, वाघोली लोहगावमध्ये हरणतळे येथे रुग्णांच्या सोयीसाठी बांधल्या जात असलेले उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांवर अद्ययावत उपचार होण्यासाठी लवकरात लवकर सुरू व्हावे. - दीपक शिंदे, वडगाव शिंदे
Web Summary : Lohgaon-Wagholi residents lament unequal development despite equal taxes compared to Viman Nagar. Basic amenities are lacking, causing disparities in property values. Residents face water scarcity, poor drainage, and hazardous roads, while Viman Nagar thrives, highlighting civic neglect.
Web Summary : लोहगांव-वाघोली के निवासी समान करों के बावजूद असमान विकास से परेशान हैं, जबकि विमान नगर समृद्ध है। बुनियादी सुविधाओं की कमी से संपत्ति मूल्यों में असमानता है। निवासियों को पानी की कमी, खराब जल निकासी और खतरनाक सड़कों का सामना करना पड़ता है।