पुणे : देशी गायीवरील संशोधनासाठी शासकीय पातळीवरून अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच देशी गायीच्या दुधाचा दर व दूध दुग्धजन्य पदार्थांचेसुद्धा दर निश्चित करून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य देण्यासाठी शासकीय पातळीवर नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मानवी आरोग्यासाठी गुणवत्तावर्धक दुधाचे उत्पादन अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पुण्यातील कृषी महाविद्यालयातील देशी गोवंश संवर्धनाच्या धर्तीवर राज्यातील अन्य कृषी विद्यापीठांमध्ये देशी गोवंश संशोधनासाठी चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयात आयोजित देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत १४ ते २२ जुलै दरम्यान ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन’ सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होत. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, परिषदेच्या महासंचालक वर्षा लढ्ढा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. सात्ताप्पा खरबडे, डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. महानंद माने, डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, “राज्य सरकारने देशी गायींच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर देशी गायीच्या संवर्धनाचे महत्त्व तसेच पशुजन्य उत्पादनाचे महत्त्व ग्राहकांना पटवून देऊन देशी गाय पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात २२ जुलै हा दिवस दरवर्षी ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.”
पाटील म्हणाले, “यांत्रिकीकरणामुळे शेती जिवंत राहत नाही. शेतीतील कार्बनचे प्रमाण वाढले गेले पाहिजे. अधिक रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येत आहेत. हे टाळण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर वाढविला पाहिजे आणि म्हणूनच देशी गायींच्या संवर्धनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. डॉ. मृणाल अजोतीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.