भोर : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना भोर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर होत असून सहा ग्रामपंचायतींनी टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, लवकरात लवकर टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सध्या निरादेवर धरणात सुमारे ४५ टक्के तर भाटघर धरणात ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी वाढत्या उष्णतेमुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः धरण परिसरातील विहिरींमध्ये अद्याप पाणी असले तरी पुढील महिन्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेवाडी, ससेवाडी, साळवडे, केळवडे, करंदी (खे.बा) आणि देगाव या गावांत पाणीटंचाई तीव्र झाल्याने मार्च महिन्यातच टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मागील वर्षी वारवंड, जयतपाडची हुंबेवस्ती आणि शिळिंब या गावांतही टंचाई निर्माण झाली होती. यंदाही या गावांकडून पुढील आठवड्यात प्रस्ताव येण्याची शक्यता असून, टँकर मागणी वाढण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, करंदी (खे.बा) गावातील नळ पाणीपुरवठा योजना मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून, तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
भोर पंचायत समितीकडे प्राप्त सहा प्रस्ताव तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, पाहणी करून लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी दिली.
Web Summary : Bhor faces acute water shortage as summer intensifies. Six villages propose tanker services. Water supply schemes are incomplete, exacerbating residents' hardship. Authorities promise swift action.
Web Summary : गर्मी बढ़ने से भोर में पानी की कमी। छह गांवों ने टैंकर सेवा का प्रस्ताव रखा। जलापूर्ति योजनाएं अधूरी, निवासियों की परेशानी बढ़ी। अधिकारियों ने त्वरित कार्रवाई का वादा किया।