पुणे : दिल्लीत बसून एक जादुगार जादूचे प्रयोग करत आहे. आता सर्वांना त्यात आनंद वाटत असला, तरी यात दोन पिढ्यांचे नुकसान झाले आहे. देशातील २५ टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालची आहे लोकसंख्येच्या लाभांशाचे वरदान संपेल आणि या पिढ्या म्हाताऱ्या होतील, तेव्हा यामुळे काय नुकसान झाले हे समजेल, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थिती पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्तांसाठी निधी का देत नाही ? असा सवाल ओवेसी यांनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील ,सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. महाराष्टातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे असे सांगुन ओवीसी म्हणाले, सध्या विद्यार्थी दशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनवले जात आहे, एका धर्माविरोधात भडकावले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नसून सध्याचे सत्ताधारी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.देशात जिथे जिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, तिथे मुस्लिम समाजाला मागे ढकलण्याचे काम केले जात आहे. मुस्लिमांना धमक्या देणे, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवणे असे प्रकार घडत आहेत. डोक्यात हवा गेल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते लक्षात येत नाही.भारत सक्षम होण्यासाठी, विश्वगुरू होण्यासाठी सर्व समाज एका पातळीवर यायला हवा. मुस्लिम समाजाला एका बाजूला सारून भारत विश्वगुरू होणार नाही,असे ओवेसी यांनी सांगितले.
दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:48 IST