पुणे : गेल्या नरगपरिषद निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, यावेळी पक्षफुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. स्थानिक राजकारणावरही त्याचा परिणाम झालेला दिसतो. दुसरीकडे भाजपमध्ये अजूनही इनकमिंग सुरू आहे. त्यातच आता जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणूक घोषित झाली असून, ही निवडणूक आघाडीत की युतीत लढवायची की स्वबळावर याचा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. सुरुवातीला नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती जरी अस्तित्वात असली तरी मात्र स्थानिक पातळीवर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी किंवा महायुती कितपत सक्रिय राहील याविषयी मात्र साशंकता व्यक्त होत आहे. सध्या कोणत्याही पक्षाने स्थानिक पातळीवर स्वबळावर लढायचे की आघाडी करून लढायचे याबाबत कोणतेही संकेत दिले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये आता काय करायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला होता, तो अजूनही दिसत आहे.
काही ठिकाणी आरक्षणाने गणिते बिघडवली आहे तर काही ठिकाणी इच्छुकांना भाजपमधील इनकमिंगमुळे पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा इच्छुकांनी काही दिवसांपासूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने त्यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. या निवडणुकीमध्ये स्वबळावर सत्ता येऊशकते की नाही याची भाजपने चाचपणी सुरु केली आहे, पण सध्या तरी त्यात यश मिळणे अशक्य वाटत आहे.पक्षाऐवजी चेहऱ्यावर निवडणूकपक्षफुटीनंतर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप तसेच भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे चेहरे जुनेच आहेत, पण पक्ष आता नवा आहे.
सासवड, जेजुरी नगरपरिषदेमध्ये संजय जगताप यांची सत्ता होती. यावेळी शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय महाविकास आघाडी आहेच. त्यामुळे याठिकाणी पक्षाऐवजी चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाण्याची जास्त शक्यता आहे. दुसरीकडे भोरमध्येही तशी अवस्था आहे. भोर नगरपरिषदेवर संग्राम थोपटे यांची एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सत्ता टिकवण्याचे थोपटेंसमोर मोठे आव्हान राहण्याची शक्यता आहे.
जुन्नरमध्ये स्वबळाचा नारासन २०१७ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे श्याम पांडे विजयी झाले होते. तर नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, आपला माणूस आपली आघाडीचे ४ उमेदवार निवडून आले होते. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांची तुल्यबळ ताकद होती. आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने दोघांची ताकद विभागली गेली आहे. तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची क्षमता बाळगून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, तसेच भाजपचा देखील स्वतंत्र उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवेल.दौंड, शिरूरला स्थानिक आघाडीचे वर्चस्वदौंड नगरपरिषदेवर प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्र पक्षाचा नगराध्यक्ष असल्याने त्यांचे वर्चस्व होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने १२ आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक होते. असे असले तर बदलत्या राजकारणातही स्थानिक आघाडीला महत्त्व राहणार असल्याचे दिसते. तिकडे शिरूर नगरपरिषदेमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. प्रकाश धारिवाल यांच्या विकास आघाडीने १८ जागा मिळवल्या होत्या. भाजप २ अपक्ष एक आणि लोक क्रांती आघाडीने एका जागेवर विजय मिळवला होता. सध्या शिरूरला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्षांची ताकद असली तरी या ठिकाणीही स्थानिक आघाडीचेच वर्चस्व राहील. तो जे काही निर्णय घेतली त्याच अनुषंगाने राजकीय घडामोडी घडतील.
बहुरंगी लढतीची शक्यतायंदा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून जाणार असून पाच वर्षांसाठी हे पद असल्याने हे पद मिळविण्यासाठी इच्छुकांनी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी सुरु केली आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकास एक लढत क्वचितच होते. त्या मुळे यंदाही बहुरंगी लढती पाहायला मिळणार असल्याचे दिसते. इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव केली असून पक्षीय स्तरावर प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
दोन नगरपंचायत व एका नगरपरिषदेसाठी पहिली निवडणूकजिल्ह्यातील १४ पैकी उरुळी देवाची फुरसुंगी आणि तीन पैकी मंचर, माळेगाव या नगरपंचायतींची ही पहिलीच निवडणूक आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निर्मिती झाली असून, या ठिकाणी इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. प्रश्न केवळ उरला आहे की लढायचं कसं?माळेगावमध्ये तर अजित पवार गट विरुद्ध इतर अशीच लढत होण्याची शक्यता आहे, तिकडे मंचरला मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेची ताकद असल्याने संमिश्र वातावरण पाहायला मिळते.
तळेगाव दाभाडेत स्थानिक आघाडीला महत्त्वतळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर मागील निवडणुकीत भाजपा १४, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती ६, जनसेवा विकास समिती ६, असे पक्षीय बलाबल होते. तिघांचा प्रत्येकी एक असे तीन स्वीकृत नगरसेवक होते. एकूण नगरसेवकांची संख्या २९ होती. दरम्यानच्या काळात, बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. भाजपा १२, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती ७, जनसेवा विकास समिती ७ असे पक्षीय बलाबल राहिल्याने स्थानिक आघाडीला महत्त्व प्राप्त झाले.
Web Summary : Uncertainty over alliances clouds Nagar Parishad elections. Party splits and shifting political landscapes leave candidates in limbo, with local coalitions gaining importance. Independent bids are rising.
Web Summary : गठबंधन को लेकर अनिश्चितता से नगर परिषद चुनाव प्रभावित। पार्टी विभाजन और बदलते राजनीतिक परिदृश्य के कारण उम्मीदवार अधर में, स्थानीय गठबंधनों का महत्व बढ़ रहा है। स्वतंत्र उम्मीदवारी बढ़ रही है।