पुणे : ‘आम्ही कोण? म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी...!’ एका भल्या मोठ्या देहाने त्याच्या तेवढ्याच खणखणीत आवाजात ही ओळ उच्चारली व समोरच्या श्रोतृंवृदांत हास्याची मोठी लकेर पसरली. ही गोष्ट १०० वर्षांपूर्वींची. ती लकेर आज १०० वर्षांनंतरही कोणी त्या विडंबन काव्य संग्रहातील कविता म्हटल्या की तशीच पसरते. कवीनेच नामकरण केलेल्या ‘झेंडूं’च्या या ‘फुलांचा’ दरवळ आजही तेवढाच ताजातवाना व टवटवीत आहे. त्यामुळेच आजही या काव्यगायनाचे कार्यक्रम नव्या पिढीलाही करावेसे वाटतात व रसिकांचा त्यांना भरघोस प्रतिसादही मिळतो.पुण्यातील प्रल्हाद केशव अत्रे नावाच्या पुण्यातीलच एका शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकाने पुण्यातच १९२५ मध्ये झालेल्या शारदा साहित्य संमेलनात त्याची ही कविता म्हटली आणि मराठी साहित्यात विडंबन काव्याचे एक नवे दालनच सुरू झाले. ‘रवीकिरण मंडळ’ या नावाने त्यावेळी पुण्यात काही कवींनी दर रविवारी एकत्र जमून आपापल्या कविता ऐकवण्याचा उपक्रम राबवला. कवी माधव ज्युलियन हे त्यांचे अध्वर्यू. त्यानंतर लगेच काही दिवसात पुण्यातच ‘पठाण क्लब’ या नावाने दुसरे मंडळ सुरू झाले. अत्रे त्याचे प्रमुख. तिथे या रवीकिरण मंडळाने केलेल्या कवितांची काव्यातच खिल्ली उडवणे सुरू केले. अत्रे त्यात अर्थातच आघाडीवर होते. राजकीय, सामाजिक भान ठेवून, कवीच्या सवयी, लकबी, शब्दवैविध्य लक्षात घेत त्यांनी केलेले विडंबन मूळ कवितेइतकेच चिरंजीव झाले.
याला यथावकाश प्रसिद्धी मिळाली. अत्रे यांनी शारदा साहित्य संमेलनात त्यांच्या या खास कवितांचे गायन केले व श्रोते हसूनहसून लोटपोट झाले. झेंडूची फुले अशा नावाने या विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. अत्रे यांच्यानंतर अनेकांनी अशा कविता केल्या, त्याला प्रसिद्धीही मिळाली, मात्र तरीही अत्रे यांच्या झेंडूंच्या फुलांचे महत्त्व कायम राहिले. याचे कारण ज्या कवितांचे त्यांनी विडंबन केले, त्या कविताही तेवढ्याच सुरेख व प्रसिद्ध झालेल्या होत्या. खुद्द अत्रे यांनीच म्हटले आहे की ज्याचे विडंबन करायचे ते मूळ एकदम अस्सल व कवितेशी इमान राखणारे होते, त्यामुळे त्यावर आधारित विडंबनही प्रसिद्ध झाले.आजही या कवितांना प्रसिद्धी मिळते. ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीराम रानडे व त्यांचे काही सहकारी या विडंबन कवितांचा कार्यक्रम झेंडूची फुले याच नावाने सादर करतात. त्यात काही कवितांचे वाचन होते तर काही कविता चाली लावून म्हटल्या जातात. त्याला नव्या पिढीचाही अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो असे अनुभव रानडे यांनी सांगितला. १३ जून २०२५ ला, आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी त्यांनी एका ग्रंथालयात हा कार्यक्रम सादर केला. आता १३ ऑगस्टला अत्रे यांच्या जयंतीदिनी गो. ल. आपटे प्रशालेत सायंकाळी ५ वाजता ते व त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करत आहेत. त्यात आम्ही कोण? या कवितेबरोबरच परिटास, श्यामले, चाफा, प्रेमाचा गुलकंद, मनाचे श्लोक व अन्य काही विडंबन कवितांचे सादरीकरण होईल.
हातभट्टीचे गाणे
आनंदी आनंद गडे, दारूबंदी चोहीकडे!हातभट्टीला भाव चढे, गल्लोगल्ली मौज उडे!सरकारी उत्पन्न बुडे, गुंडांना धनलाभ घडे!
चारोळी“मान मोडेल गं तुझी,किती अंबाड्याचा बोजा!”“इश्श!” हासून ती म्हणे,“त्यात आहे पायमोजा!”
परिटासपरिटा येशील कधी परतून?
कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून,उरल्यासुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून,
बारीकसारीक हातरूमाल हातोहात उडवून,सदऱ्यांची या इस्तरीने तव चाळण पार करून,
खमिसांची ही धिरडी खरपूस भट्टीमध्ये परतून,तिच्या भरजरी पैठणीची मच्छरदानी करून,
गावातील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून,रुमाल जरीचे आणि उपरणी महिनाभर नेसून,
सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चापून!
आम्ही कोण?आम्ही कोण? म्हणूनी काय पुसता दाताड वेंगाडुनी!
फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला?किंवा ‘गुच्छ’, ‘तरंग’, ‘अंजली’ कसा अद्यापी न वाचिला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातूनी,ते आम्ही परवाड : मयातील करू चोरून भाषांतरे,
ते आम्ही न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!डोळ्यादेखत घालूनी दरवडा आम्ही कुबेराघरी,
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही अमुची लक्तरे!काव्याची भरगच्च घेऊन सदा काखोटिला पोतडी,
दावू गाऊनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये!दोस्तांचे घट बैसवून करू या आम्ही तयांचा उदे,
दुष्मनावर एकजात तुटूनी की लोंबवू चामडी!आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील साप्ताहिके,आम्हाला मगळा, खलास सगळी होतील ना मासिके!
मना सज्जनामना सज्जना, चार आण्यात फक्ततुला व्हावयाचे असे देशभक्ततरी सांगतो शेवटी युक्ती सोपीखिशामाजी ठेवी सदा गांधीटोपी
श्यामलेतू छोकरी, नही सुन्दरी, मिष्किल बाल चिचुन्दरी!
काळा कडा मी फत्तरी, तू काश्मिरातील गुल-दरी!पाताळिंचा सैतान मी, अल्लाघरची तू परी!
तू मद्रदेशीय श्यामला, मी तो फकीर कलन्दरी!मैदान मी थर्रपाकरी, ती भूमी पिकाळ गुर्जरी!
अरबी समुद्रही मी जरी, तू कुद्रती रसनिर्झरी!आषाढीचा अन्धार मी, तू फाल्गुनी मधुशर्वरी!
खग्रास चंद्र मलीन मी, तू कोर ताशिव सिल्व्हरी!बेसूर राठ सुनीत मी, कविता चतुर्दश तू खरी!
‘कवि’ आणि ‘कवडा’
माडीच्या खिडकीमध्ये कवी कुणी होता सुखे बैसला,भिक्षांदेही करावयास कवडा कुणी आला त्या स्थळा!
“का हो काव्य नवीन काय लिहिता?” त्याते पुसे खालुनी,सांगे नाव कवी, हसून कवडा हो चालता तेथुनी!
चार दिवसांनी मासिकात येई,काव्य कवड्याचे, नाव तेच त्याही!
रसिक म्हणती, “वा, और यात गोडी!”कवी हासुनी आपुले काव्य फाडी!