लष्कर : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरोदर महिलेच्या उपचारासाठी दहा लाख डिपॉझिट मागितल्या प्रकरणावरून महापालिका खडबडून जागी झाली. असा प्रकार इतर रुग्णालयात होऊ नये यासाठी महापालिकेने महापालिकेच्या हद्दीत असलेल्या रुग्णालयांना 'बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९' नुसार प्रत्यक्ष नोटीस काढल्या आणि प्रत्येक रुग्णाशी सौजन्याने वागणे व आणीबाणीच्या, गरजेच्या वेळी रुग्णांकडून डिपॉझिट रक्कम न घेण्याची सूचना केली. मात्र, पुणे कँटोन्मेंट बोर्डाने त्यांच्या हद्दीतील रुग्णालयांना काहीच नोटीस काढली नाही. त्यामुळे येथील नागिरकांनी नाराजी व्यक्त केली.पुणे कँटोन्मेंट बोर्ड हे कोरोना काळात महापालिका आणि राज्यशासन यांनी सुचविलेल्या उपाययोजना राबवत होते. पटेल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग देखील महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय अधिनियमानुसार उभारले. येथील कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत, सेवा व शर्ती या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे आहेत. मात्र, पुण्यात एवढीगंभीर घटना घडली असताना बोर्डाने देखील त्यांच्या हद्दीतील रुग्णालयांना अनामत रक्कम डिपॉझिट रक्कम घेऊ नये, या अपेक्षेत आहेत.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट नसल्याने उपचार नाकारल्याने गर्भवती मातेला आपल्या जिवाला मुकावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले. रुग्णालयाचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना ७मार्च रोजी पुणे मनपा प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, रुग्णालये यांना तत्काळ नोटीस काढत दि बॉम्बे नर्सिंग अॅक्ट १९४९ मधील सर्व तरतुदींचे पालन करीत येणाऱ्या रुग्णांशी सौजन्याने वागण्याचे आदेश एक नोटीस काढत दिले असून आणीबाणीच्या वेळी, अतिदक्षतासारख्या विभागात रुग्ण भरती होताना त्यांच्याकडून डिपॉझिट घेऊच नये.
महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता रुग्णांना प्रथम्याने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा देता येतील आणि जीवित रक्षणासाठी सुवर्णकालीन (गोल्डन हॉवर्स ऑफ ट्रीटमेंट) उपचार निकषांचे पालन केले जाईल, अशी नोटीस काढली आहे. मात्र बोर्डाकडून नोटीस दिली गेली नाही.
मी बोर्ड कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत बोललो आहे, साहेब सुटीवर आहेत, पण तरी याविषयी मी रुग्णालय अधीक्षकाला योग्य ती कारवाई करायला सांगितले आहे.- सचिन मथुरावाला, प्रशासक पुणे कँटोन्मेंट बोर्ड अनेकदा तक्रार केल्या, प्रत्येक वेळी पैसे नाहीत अशी उत्तरे मिळतात, जर जमत नसेल तर कैंटोन्मेंटने सर्व आवश्यक विभाग बंद करून आपले पूर्वीचे ताप, थंडी खोकल्याचा दवाखाना सुरु करावा.- श्रीपाल कांबळे, रहिवासी, घोरपडी
हे आहेत कॅन्टोन्मेट बोर्ड परिसरातील रूग्णालयपुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयासह राममंगल हार्ट केअर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट वानवडी (५० बेड), कावेडिया चेस्ट हॉस्पिटल नवा मोदीखाना (२१बेड, ३ बेडचे अतिदक्षता विभाग, झेड एम. व्ही. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आझम कॅम्पस हिदायतुल्लाह रोड (१०५ बेड) ही मुख्य खासगी रुग्णालये तसेच उषा नर्सिंग होम (नवा मोदीखाना), तेलंग मॅटर्निटी (जान मोहम्मद स्ट्रीट), अथर्व हॉस्पिटल (शिवाजी मार्केट) यांच्यासह अनेक लहान-मोठी नर्सिंग होम्स आणि रुग्णालय ही पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येतात. याचे परवाने दरवर्षी बोर्ड नूतनीकरण करते.