पुणे :पुणेमेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (दि.२५) मंजुरी मिळाली. यामुळे शहरातील मेट्रोची जाळे आणखी विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. सध्या मेट्रो दैनंदिन तब्बल १ लाख ७० हजार प्रवासी वापर करीत आहेत. नव्या मार्गिकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व-पश्चिम भाग, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी हब दरम्यान प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना तासनतास कोंडीत अडकून प्रवास करावा लागत आहे. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन नव्या मार्गिकांना मंजुरी मिळाल्याने चांदणी चाैकापासून थेट वाघोलीच्या पुढे सुसाट प्रवास होणार आहे. दुसरीकडे स्वारगेट ते कात्रज हे काम झाले, तर कात्रजपासून निगडी, वाघोली व शहरातील मध्यवर्ती भागात प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
तसेच नगर रस्त्यावर दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. नवा मेट्रो हा थेट वाघोलीच्या पुढे विठ्ठलवाडीपर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नगर मार्गावर होणारा वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून, शहरातील नागरिक, प्रवासी कामगार यांनी थेट मोठ्या ठिकाणी जोडल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. या दोन मार्गिकेमुळे आयटी हब, व्यावसायिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि निवासी ठिकाणे जोडली जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत मोठा वाटा मेट्रोचा असेल तसेच मेट्रो प्रवाशांची संख्याही वाढेल. यामुळे अखंड मल्टिमॉडेल शहरी प्रवास करताना अधिक सोयीचे होणार आहे.
असे आहेत स्थानके :वनाज ते चांदणी चौक दरम्यान स्थानके --- कोथरूड बस डेपो, चांदणी चौक.
रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी दरम्यान स्थानके --- विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी.
असे होणार दोन मार्गिका :दोन्ही मार्गिकेची एकूण लांबी - १२.७५ किमी
वनाज ते चांदणी चौक मार्गाची लांबी - १.२ किमीरामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी मार्गाची लांबी - ११.६३ किमी
प्रकल्पाचा अपेक्षित एकूण खर्च - ३६२४.२४पूर्ण होण्यासाठी अंदाजे कालावधी - ४ वर्षे
या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो विस्तारित मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी, यासाठी नुकतीच केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली. त्याला आज यश आले आहे. पुणे शहर व परिसराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असून, मेट्रोचा शहराच्या सर्व भागात विस्तार करण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. नव्या दोन मार्गांमुळे पुणे शहराची पूर्व आणि पश्चिम ही दोन टोके मेट्रोने जोडली जाणार आहेत. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, विमान नागरी वाहतूक शहरातील सार्वजनिक वाहतुकीला गतिमान व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी पुणे मेट्रो हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होऊन पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता, वेळेची बचत आणि सुरक्षिततेचा मोठा फायदा होणार आहे. वनाज ते चांदणी चौक मार्ग हा प्रचंड वाढत्या रहदारीसाठी दिलासा ठरणार आहे. विशेषतः वाघोली परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वसाहतींसाठी ही मेट्रो लाइफलाइन ठरणार आहे. - माधुरी मिसाळ, नगरविकास, राज्यमंत्री.