पुणे :पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात रोज अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते. पण अतिक्रमण कारवाईला २४ तास होत नाहीत तोच पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे अतिक्रमण कारवाई केवळ नावालाच केली जात असल्याची टीका विविध स्तरातून पालिका प्रशासनावर होत आहे. पालिका प्रशासन अनधिकृत हातगाडी, पथारी व्यावसायिक यांच्यावर ठोस कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटपाथ आहेत. मात्र, यातील निम्म्याहून अधिक फुटपाथ अतिक्रमणांनी गिळंकृत केला आहे. पथारी व्यावसायिकांनी फुटपाथ काबीज केलेला आहे. मध्यवर्ती भागातील हे चित्र उपनगरातही पाहायला मिळते. उर्वरित फुटपाथवरून कोठे भरधाव दुचाकी चालविल्या जातात, तर अनेक ठिकाणी वाहने उभी केलेली असतात. फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे शहरात अपघातानांही निमंत्रण मिळत आहे. अनेक फुटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अनेक दुकानदार, कार्यालयातील कर्मचारी फुटपाथवरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात.
विक्रेत्यांनी फुटपाथवर दुकाने थाटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीने हैराण असलेल्या पुणेकरांना फुटपाथवरून चालतानाही वाहनचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे पुणेकरांचा श्वास कोंडला जात आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. या कारवाईत हातगाडी, साहित्य, सिलिंडर गॅस जप्त केले जाते. पण कारवाई झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत अनेक रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणाची स्थिती जैसे थे असते. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ दाखवण्यासाठी कारवाई करतो का असा सवाल उपस्थित केला जातो.
अतिक्रमण कारवाईला येण्याअगोदरच मिळतो निरोप
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने विविध भागात कारवाई केली जाते. पण अतिक्रमण विभाग कुठे कारवाई करणार आहे त्याची माहिती संबंधित ठिकाणी आगोदरच मिळालेली असते. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग तिथे जाण्याआगोदरच पथारी व्आवसायिक आणि हातगाडीवाले यांनी धूम ठोकलेली असते. त्यामुळे अतिक्रमण कारवाईला येण्याअगोदरच निरोप मिळण्याची ‘अर्थ’पूर्ण प्रथा बंद होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी
पुणे महापालिका प्रशासनाकडून नदीपात्रातील रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कर्वेनगर, ताथवडे उद्यान परिसरात देखील फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमधील शेडवर कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई म्हणजे तात्पुरती होती. नदीपात्रात दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांची स्थिती जैसे थे होती.
अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचे पथारी व्यावसायिकांशी लागेबांधे आहेत. कारवाईपूर्वी पथारीवाल्यांना माहिती देणारे कर्मचारी, ज्या भागात सातत्याने अतिक्रमण होत आहे तेथील अधिकारी यांच्यावर कामचुकारपणा केल्यास कारवाईची जरब बसविल्याशिवाय ही समस्या सुटणे अवघड आहे, असे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
Web Summary : Pune's anti-encroachment drives are ineffective. Footpaths remain encroached by vendors, forcing pedestrians onto roads. Despite seizures, encroachments reappear within 24 hours, raising questions about the sincerity of the municipal corporation's actions and potential staff collusion.
Web Summary : पुणे में अतिक्रमण विरोधी अभियान अप्रभावी हैं। फुटपाथ पर विक्रेताओं का अतिक्रमण है, जिससे पैदल चलने वाले सड़क पर चलने को मजबूर हैं। जब्ती के बावजूद, 24 घंटे के भीतर अतिक्रमण फिर से हो जाते हैं, जिससे नगर निगम की कार्रवाई की गंभीरता और संभावित कर्मचारियों की मिलीभगत पर सवाल उठते हैं।