चाकण : खेड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून तब्बल १२५ कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी मिळवण्याचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाॅर सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये चर्चेला उधाण आले असून, “श्रेय कुणीही घ्या; पण रस्त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवा,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खेड तालुक्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून ‘पीएमआरडीए’चे प्रमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा आमदार बाबाजी काळे यांनी सोशल मीडियावर केला आहे. दुसरीकडे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. यामुळे दोघांमध्ये सोशल मीडियावर चुरस निर्माण झाली आहे.
आजी-माजी आमदारांमधील शीतयुद्ध
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुका सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेला आणि बाबाजी काळे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची सल मोहिते-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे आपली निवड झाल्याचा दावा बाबाजी काळे करत आहेत. निवडणुकीपासूनच या दोघांमधील शीतयुद्ध तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
मोहिते-पाटील यांनी बाबाजी काळे यांच्या निवडणुकीविरोधात याचिका दाखल केल्याने हे अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले. याचाच परिणाम म्हणून ‘पीएमआरडीए’कडून मंजूर झालेल्या १२५ कोटींच्या निधीचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत सोशल मीडियावर चढाओढ दिसून येत आहे.
नागरिकांची अपेक्षा : खड्डेमुक्त रस्ते
खेड तालुक्यातील रस्त्यांची अवस्था निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि पावसामुळे अत्यंत बिकट झाली आहे. मंजूर झालेल्या १२५ कोटींच्या निधीमुळे काही रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी आशा नागरिकांना आहे. मात्र, आजी-माजी आमदारांमधील शीतयुद्धाचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होऊ नये, अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.
विकासकामांमुळे खीळ
रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी हा तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, आजी-माजी आमदारांमधील वादामुळे विकासकामांना खीळ बसू नये, अशी जनतेची अपेक्षा आहे. “श्रेय कुणाचेही असो, रस्त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नेते काय म्हणाले?
खेड तालुक्यातील काही रस्त्यांसाठी ११८ कोटींचा निधी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून मंजूर झाला आहे. हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या सहकार्याने आणि माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. - बाबाजी काळे, आमदार
खेड तालुक्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. - दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार