- रमेश फरताडेसोमाटणे : नेहमी शिक्षकच प्रश्न विचारतात, पण सोमाटणेच्या जिल्हा परिषद शाळेत आज गोष्ट उलटीच घडली! चौथीच्या वर्गात शिक्षणाधिकारी आले, प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि अचानक मेघा पंडित या धाडसी विद्यार्थिनीने साहेबांनाच विचारलं "What is your favorite dish?" सगळा वर्ग क्षणभर स्तब्ध… आणि साहेबही थोडेसे गोंधळले! पण मग त्यांनी हसत उत्तर दिलं ‘गुलाबजामून!’ बस्स! मग काय... वर्गभर हशा आणि टाळ्यांचा गडगडाट! शिक्षणाधिकाऱ्यांचं उत्तर ऐकून एक-दोन जणांनी ‘माझं पण आवडतं!’ अशीही कुजबुज सुरू केली.ही मजेशीर भेट होती पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची. त्यांनी सोमाटणे शाळेला अचानक भेट देऊन मुलांची तयारी, वाचन, लेखन, इंग्रजी स्पेलिंग, पाढे अशा अनेक गोष्टी तपासल्या; पण विशेष लक्षात राहिली ती म्हणजे विद्यार्थ्यांशी झालेली ही मनमोकळी गप्पा! यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, केंद्रप्रमुख अशोक मिसाळ आणि इतर शिक्षणविषयक अधिकारीही उपस्थित होते.
तसेच, करण चव्हाण या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त दिलेल्या भाषणावर साहेबांनी विशेष कौतुक केले. पाहणीदरम्यान साहेबांनी शाळेची स्वच्छता, इमारतीची सुविधा, ग्रामस्थांचा सहभाग आणि सीएसआर फंडातून उभारलेल्या सुंदर इमारतीबद्दल माहिती घेतली आणि मुख्याध्यापिका पुष्पा घोडके यांचेही कौतुक केले.