पुणे - सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या धायरीहून राजाराम पुलाकडे येणाऱ्या दुसऱ्या मार्गाचे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी लोकार्पण झाले. अवघ्या अर्ध्या मिनिटाचे लोकार्पण, एका साध्या शब्दाचाही उच्चार नाही. फित कापून मुख्यमंत्री त्याच मार्गाने पुढे निघून गेले. पण तेवढ्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीचा तब्बल अडीच तास खोळंबा झाला. लोकार्पणानंतर मार्ग मात्र लगेचच सर्वांसाठी खुला करण्यात आला.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, बापू पठारे, सुनील कांबळे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यापासून महापालिका तसेच प्रशासनातील सर्व लहान मोठे अधिकारी मुख्यमंत्र्यांची वाट पाहत तासभरापेक्षा जास्त वेळ थांबून होते. ‘मुख्यमंत्री लवकरच येत आहेत’, असे सांगत सांगत निवेदकही कंटाळून गेला. मंत्री मिसाळ यांनीही एकदा ध्वनीवर्धकावर ‘लवकरच मुख्यमंत्री येत आहेत’, असे जाहीर केले.पुलाखालीच एक शामियाना उभारण्यात आला होता. तिथेच एक कोनशिला लावली होती. कार्यक्रमाची वेळ दुपारी ३ वाजता होती. मुख्यमंत्री आले साडेचार वाजता. ३ वाजण्यापूर्वीपासूनच पुलाच्या दुसऱ्या बाजूकडील वाहनांची कोंडी होऊ लागली होती. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रमुख पाहुणे, अधिकारी यांचीच इतकी वाहने येत होती की वाहतुकीची कोंडी सतत होत होतीच.मुख्यमंत्री फडणवीस आल्यानंतर लगेचच त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर ते चालत पुलापर्यंत गेले आणि तिथे फित कापली. तोपर्यंत मुख्यमंत्री व अन्य पाहुण्यांच्या गाड्या तिथे आल्याच होत्या. मुख्यमंत्री तिथेच आपल्या गाडीत बसले व तसेच पुढे निघून गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा ताफाही सुसाट वेगाने निघाला. मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाहीत. फक्त अर्ध्या-एका मिनिटात लोकार्पण झाले. पोलिसांनी त्यानंतर पूल लगेचच सर्वांसाठी खुला केला. राजकीय हट्टयाआधी पुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे आता दुसऱ्या मार्गिकेच्या लोकार्पणासाठी ‘मुख्यमंत्रीच हवेत’, या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हट्टामुळे काम पूर्ण झाल्यानंतरही ही मार्गिका १५ दिवस बंदच होती. विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केल्यानंतर तिथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अखेर सोमवारी पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला. शहरातील सर्वाधिक अंतराचा (२.५ किलोमीटर) हा उड्डाणपूल आता पूर्ण क्षमतेने (दोन्ही मार्गिका) सुरू झाला आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच रस्ता पार करण्यासाठी लागणारा तब्बल अर्धा तासाचा वेळ फक्त ६ ते १० मिनिटांवर येणे अपेक्षित आहे. आंदोलक, पत्रकारांना त्रासमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांना निवेदन देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे काही कार्यकर्ते तिथे आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना तिथे थांबू दिले नाही. त्याचबरोबर एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सहायक पोलिस अधिकाऱ्याला, ‘पत्रकारांना इथे थांबू देऊ नका, असे आदेश होते; तरीही तुम्ही का थांबवले?’, असे म्हणून ओरडले. मुख्यमंत्री आल्यानंतर तिथे भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली.
सिंहगड रस्ता उड्डाणपूल लोकार्पण; खेळ अवघ्या अर्ध्या मिनिटाचा, त्यासाठी अडीच तास वाहतूकीचा खोळंबा
By राजू इनामदार | Updated: September 1, 2025 18:37 IST