कोरेगाव भिमा : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) आणि श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथील स्मारकांचे काम मराठा स्थापत्य शैलीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. ही स्मारके पर्यटनस्थळ नसून तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावीत, अशी मागणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या ठिकाणच्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारकांच्या चालू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल, स्मृती समितीचे मिलिंद एकबोटे, वढू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपअभियंता अजय पाटील यांच्यासह शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, शंभूराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या वढू-तुळापूर येथील भूमीला विशेष स्थान आहे. या ठिकाणच्या स्मारकांचा विकास हा तरुण पिढीला प्रेरणा देणारा आणि स्फूर्ती देणारा असावा. त्यामुळे ही स्मारके पर्यटनस्थळ नसून तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावीत, यासाठी बांधकाम विभागाने त्या दृष्टिकोनातून बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तुळापूर येथे स्मारकाला मूर्त स्वरूप
तुळापूर येथील स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे. येथे महाद्वार, तिकीट घर, संग्रहालय, अल्पापोहारगृह, ऑडिटोरियम आणि नदीवरील घाटाचे काम सुरू आहे. काळ्या बेसॉल्ट दगड आणि चुनखडीचा वापर करून मराठा स्थापत्य शैलीनुसार कामाला गती मिळत आहे. पुढील टप्प्यात आपटी-तुळापूर पूल आणि आपटी-वढू रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात येणार असल्याचे आर्किटेक्चर हेमंत पाटील यांनी सांगितले.
वढू बुद्रुक येथील कामाला अडथळा
वढू बुद्रुक येथील स्मारकाच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली, तरी केईएम रुग्णालयाच्या स्थलांतराचा प्रश्न अनुत्तरित आहे. पर्यायी जागा न मिळाल्याने येथील सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. याबाबत शंभू भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून पुढील आठवड्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी रस्त्याचे चौपदरीकरणाची मागणी
वढू-तुळापूर येथील स्मारकांचा विकास पूर्ण झाल्यावर शंभू भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. सध्या तुळापूर फाटा ते आळंदी रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. या रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी तुळापूर, फुलगाव आणि वढू खुर्द ग्रामपंचायतींसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केली आहे.